भिवंडी - भिंवडी तालुक्यातील सोनटक्के गावातील पोलीस पाटील दिपक पाटील यांच्यवर गावातील गावगुंडांनी प्राणघात हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली आहे. या हल्यात पोलिस पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सूरू आहेत. याप्रकरणी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रुपेश भगत हा दारू पिऊन पत्नीला मारहाण करत असल्याने पत्नीने पती रुपेश विरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असता गावचे पोलीस पाटील या नात्याने तालुका पोलिसांनी पोलीस पाटील दीपक पाटील यांना आरोपी रुपेश भगत यास पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा निरोप देण्यास सांगितले असता पोलिसांचा निरोप रुपेश यास दिला असता या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांनी पोलिस पाटील कवाड येथे कामानिमित्त आले असता त्याठिकाणी गाठून या दोघांनीही लाकडी दाडक्यानी लाथाबूक्यांनी मारहाण करून पोलीस पाटील यांना गंभीर जखमी केले.
या मारहाण प्रकरणी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र जखमी पोलीस पाटील हे शासकीय सेवक असल्याने आरोपींवर गंभीर गुन्ह्याची नोंद व्हावी व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस पाटील यांच्या कुटुंबियां बरोबरच पोलीस पाटील संघटना तसेच श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आली होती . शुक्रवारी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींवर गंभीर गुन्हा दाखल केल्याची मागणी केल्या नंतर शुक्रवारी तालुका पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात कलम ३५३ सह इतर गंभीर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणातील दोन्ही आरोपी अजूनही फरार असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.