मुंबई - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोखंडाच्या खाणीच्या सुरक्षेसाठी गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित पोलीस केंद्राच्या स्थापण्यासाठी अखेर ‘मुर्हूत’ मिळाला आहे. सुरजागड येथील खाणीच्या संरक्षणासाठी अधिकाऱ्यांसह १०० पोलिसांची पदाच्या निर्मितीसाठी वित्त विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे.सुरजागड येथील लोखंडाची खाण नक्षलवाद्यांच्या ‘रडार’वर आहे. याठिकाणी नेहमी चकमकी घडत असतात. त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा ताण स्थानिक पोलिसांवर पडत असल्याने याठिकाणी स्वतंत्र सहाय्य केंद्राची मागणी करण्यात आली होती, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोखंडाच्या खाणीच्या संरक्षणासाठी नेंडेर व येलचिल येथे पोलीस मदत केद्र स्थापन करण्याच्या प्रस्ताव महासंचालक कार्यालयामार्फत गृह विभागात पाठविण्यात आला होता. गेल्यावर्षी २१ एप्रिलला उच्च अधिकार समितीने त्याला मान्यता दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता. जवळपास दीड वर्षानंतर त्याला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावानुसार दोन्ही पोलीस मदत केंद्र ही सशस्त्र कार्यरत असणार आहेत.
खाणीच्या दोन्ही पोलीस मदत केंद्रात प्रत्येकी पाच उपनिरीक्षक, ४५ कॉन्स्टेबल अशी कुमूक असणार आहे. नव्याने निर्माण केलेल्य या एकुण १०० पदांना एक ऑक्टोबरपासून २९ फेबु्रवारी २०२० पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार दोन्ही केंद्रात आता २४ तास सशस्त्र मनुष्यबळ उपलब्ध राहू शकणार आहे.