लंडन - पंजाब नॅशनल बँकेचा १३७०० कोटी रुपयांचा घोटाळा आणि मनी लॉण्डरिंगप्रकरणी नीरव मोदीच्या (४८) कोठडीत २७ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठीची सुनावणी लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात आज पार पडली. त्यावेळी कोर्टाने भारताला नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार असा सवाल करत १४ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच या प्रकरणी पुढिल सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे.
लंडनमधील कोर्टाचे न्या. एम्मा अर्बथनॉट यांनी भारतीय सरकारला नीरव यांना कोणत्या तुरुंगात ठेवले जाईल विचारणा करत याबाबत १४ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. 13,700 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव दक्षिण-पश्चिम लंडनमधील वांड्सवर्थ जेलमध्ये आहेत. १९ मार्च रोजी नीरवला सेंट्रल लंडनच्या मेट्रो बँक शाखेतून अटक करण्यात आली. तेथे नीरव मोदी बँक खाते उघडण्यास गेला होता. त्याने आपल्याला जामीन मिळावा आणि आपले प्रत्यार्पण रोखावे यासाठी तेथील कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र, याआधी त्याच्या दोन याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. त्याने वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला होता.