मुंबई - न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एक भारतीय जखमी झाला आहे. या भारतीयाची ओळख पटली असून अहमद जहांगीर असं त्याचं नाव आहे. अहमद जहांगीर यांची प्रकृती गंभीर असून न्यूझीलंडमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
एमआयएचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टि्वट करुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयाला अहमद जहांगीरचा भाऊ इक्बाल जहांगीरला मदत करण्याचे आवाहन केले आहे. इक्बाल जहांगीर हैदराबादचा रहिवाशी असून भावाच्या कुटुंबाच्या मदतीसाठी इक्बालला न्यूझीलंडला जायचे असल्याने सुषमा स्वराज आणि तेलंगण मुख्यमंत्री कार्यालयाने इक्बालसाठी आवश्यक ती व्यवस्था करावी असे ओवेसी यांनी टि्वटमध्ये नमूद केले आहे.
इक्बालला व्हिसा मिळण्यासाठी ती प्रक्रिया वेगवान गतीने करण्यासाठी सहकार्य करा. न्यूझीलंडला जाण्यासाठी तो त्याची सर्व व्यवस्था करेल असे ओवेसी यांनी टि्वटमध्ये नमूद केले आहे. न्यूझीलंडमध्ये ९ भारतीय बेपत्ता आहेत अशी माहिती न्यूझीलंडमधील भारतीय उच्च आयुक्त सानजी कोहली यांनी दिली आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या या गोळीबारत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.