भारतीय नौदलाला शनिवारी मोठं यश मिळालं. पाकिस्तानातून समुद्रामार्गे भारतात आणलं जाणाऱ्या ड्रग्सची मोठी खेप नौदलानं गुजरातनजीक पकडली. या पकडलेल्या ड्रग्सची किंमत २ हजार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. या वर्षांची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाला या संदर्भात गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली होती. यानंतर भारतीय नौदलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळून ड्रग्जची खेप पकडली. पाकिस्तानातून मासेमारी करणाऱ्या बोटीतून अंमली पदार्थांची खेप भारतात आणली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी पाकिस्तानातून चीनला पाठविण्यात आलेले घातक किरणोत्सरी पदार्थ गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर जप्त करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणावर रेडिओॲक्टिव्ह पदार्थ आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. परदेशी मालवाहू नौकेतून अनेक कंटेनर्स जप्त करण्यात आले होते. माहिती न देता धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीच्या संशयातून ते जप्त करण्यात आले होते. तसंच मुंद्रा पोर्टवर १६ सप्टेंबर २०२१ रोजी ३ हजार किलोग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. अफगाणिस्तानातून इराणमार्गे ते भारतात पाठवण्यात आले होते. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मोठी ड्रग्ज तस्करी करण्यात आली होती.