भारतीय नौदलाने अरबी समुद्रात मोठी कारवाई केली आहे. इराणहून गुजरातला आणले जाणारा मोठा ड्रग्जचा साठा पकडला आहे. याची किंमत थोडी थोडकी नसून १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. नौदलाची गुप्तचर यंत्रणा आणि एनसीबीने मिळून ही कारवाई केली आहे.
नौदलाने २६०० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. हे ड्रग्ज इराणहून गुजरातच्या बंदरावर आणले जात होते. तिथे पोहोचण्यापूर्वीच हे ड्रग ताब्यात घेण्यात आली आहे. हा जहाजावर असलेल्या माफियाला कोची बंदरावर नेण्यात आले आहे. त्याची चौकशी नौदल आणि एनसीबी करत आहेत. या रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी आहेत, ते कोणाला डिलिव्हर केले जाणार होते, आदी चौकशी केली जाणार आहे.
भारतीय समुद्रकिनाऱ्यावर काही माफिया मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करणार असल्याचे गुप्त सुचना नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. यामुळे नौदलाने यासाठी एनसीबीची मदत घेत ही कारवाई केली. नौदलाच्या जहाजाने (INS TEG F-45) अरबी समुद्र परिसरात ही अमली पदार्थाची खेप पकडली आहे. अधिकाऱ्यांनी एका ड्रग्ज माफियालाही अटक केली आहे. सुदानमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी आयएनएस टीईजी तैनात करण्यात आली होती. तिथून परतताच ही मोठी कारवाई झाली आहे.
याआधीही फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स युनिटने २००० कोटींच्या ड्रग्जची खेप पकडली होती. गुजरातच्या लगतच्या सागरी भागात अनेकवेळा कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यावेळी सागरी मार्गाने भारतात आणली जाणारी ड्रग्जची ही सर्वात मोठी खेप होती आहे.