Fraud Crime, Indian Player: भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) अडचणीत सापडला आहे. २१ वर्षीय लक्ष्यविरुद्ध वयाशी संबंधित फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरोप आहे की लक्ष्य सेन आणि त्याचा भाऊ चिराग सेन यांनी अल्पवयीन स्पर्धेत खेळण्यासाठी आपले वय लपवले. एफआयआरमध्ये लक्ष्यचे वडील धीरेंद्र सेन, भाऊ चिराग सेन, आई निर्मला आणि विमल कुमार यांचीही नावे आहेत. विमल कुमार १० वर्षांहून अधिक काळ लक्ष्य आणि चिराग यांना प्रशिक्षण देत आहेत.
लक्ष्यवर हे आरोप
लक्ष्य सेनवर भारतीय दंड संहिता अंतर्गत बनावट कागदपत्रे (४७१) खरी म्हणून वापरून फसवणूक (कलम ४२०), खोटेपणा (४६८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, लक्ष्यचे वय २४ वर्षे आहे, जे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (BAI) मध्ये नोंदवलेल्या त्याच्या जन्मतारीख (१६ ऑगस्ट २००१) पेक्षा तीन वर्षे जास्त आहे. मोठा भाऊ चिराग कथितपणे २६ वर्षांचा असल्याचे सांगितले जात आहे, तर BAI च्या ओळखपत्रानुसार त्याचे वय २४ वर्षे (२२ जुलै १९९८) आहे.
मूळचे उत्तराखंडचे असलेले सेन बंधू, बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीमध्ये विमल कुमार यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतात. तर तक्रारदार त्याच शहरात दुसरी अकादमी चालवतात. विमलने २०१० मध्ये लक्ष्यच्या पालकांशी संगनमत करून जन्म दाखला खोटा केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
लक्ष्यला नुकताच मिळाला अर्जुन पुरस्कार
फिर्यादीनुसार, लक्ष्य सेनने कमी वयोगटातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक तरुण प्रतिभावान खेळाडूंची संधी हिरावून घेतली. तक्रारदाराने या पाच जणांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी लक्ष्य आणि त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. लक्ष्यवरील हे आरोप सिद्ध झाले तर नुकताच अर्जुन पुरस्कार मिळालेल्या त्याला त्याच्या अनेक विक्रमांवरील दावे सोडून द्यावे लागतील.