बंगळुरु - कर्नाटकच्या बंगळुरु बाहरी परिसरात पोलिसांना ३ महिन्याच्या आत ५ महिलांचे मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहावर कुठल्याही खुणा नव्हत्या. या महिलांना सायनाइड देऊन मारण्यात आल्याचं पोस्टमोर्टममधून पुढे आलं. या महिलांना कुणी आणि कशासाठी मारलं असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला. या महिलांना मारण्यामागे काय हेतू असावा? याचा शोध घेतला जात आहे. एका पुरुषाने ही हत्या केली असावी असा अंदाज लोकांनी व्यक्त केला.
या हत्येचं रहस्य उलगडल्यानंतर प्रत्येक जण हैराण झाला. कुठल्या पुरुषाने नव्हे तर एका महिलेनेच या हत्या केल्याचं समोर आलं. केडी केम्पम्मा नावाच्या या महिलेला सायनाइड मल्लिका असं नाव दिलं आहे. ती भारतातील पहिली महिला सीरियल किलर आहे. जिला दोषी आढळल्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली आहे. केम्पम्माने १९९८ पहिली हत्या केली होती. त्यानंतर ७ वर्ष गॅप घेत इतर हत्या केल्या. या कालावधीत आरोपी महिलेने महिलांना निशाणा बनवलं होतं. मल्लिकाची कहानी इतर महिलांसारखीच होती. ती महत्त्वाकांक्षी होती. तिची स्वप्नं होती. बस्स केवळ तिच्या स्वप्नाच्या मार्गात कुणी आला तर त्याला ती मृत्यू द्यायची.
हायप्रोफाईल आयुष्य जगायचं होतं
केम्पम्मा हिचा जन्म १९७० मध्ये बंगळुरुच्या उपनगरीय परिसरात झाला. केम्पम्माचं कुटुंब सामान्य होतं. परंतु तिला हायप्रोफाईल आयुष्य जगायचं होतं. अल्पवयीन असतानाच तिचं लग्न झालं. त्यानंतर ती आई बनली. दोन मुलं झाली. केम्पम्मा तिच्या जीवनशैलीत खुश नव्हती. त्यानंतर तिने रातोरात श्रीमंत होण्याचं ठरवलं. तिनं त्या घरात चोरी करणं सुरु केलं जिथं ती काम करत होती. तिने तिच्या घराजवळच चिटफंडचं काम सुरु केले. कंपनीचं नुकसान झालं आणि तिचं कुटुंब कर्जात बुडालं. केम्पम्माला रागाच्या भरात पतीने घरातून काढून टाकलं. त्यानंतर सायनाइड मल्लिकानं पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग शोधला. अडचणीत असलेल्या सर्वसामान्य महिलांना आणि युवतींना तिनं जाळ्यात ओढलं. त्यानंतर श्रीमंत कुटुंबातील महिलांना निशाणा बनवलं.
सोनाराकडं नोकरी करताना मिळालं सायनाइड
केम्पम्मानं एका सोनाराकडं कामाला होती. त्याठिकाणी तिला सायनाइड मिळालं. सायनाइड हे एकप्रकारचं विष आहे असं तिने सिनेमात पाहिलं होतं. तिने चोरीसाठी सायनाइडचा वापर करण्याचं ठरवलं. ती रोज मंदिरात जायची आणि त्याठिकाणी येणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवायची. त्यातील काही महिलांची निवड करून ती त्या महिलांना स्वत: देवी असल्याचं सांगायची आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आमिष द्यायची. समस्या दूर करण्यासाठी मंडल पूजा करायला सांगायची. त्यानंतर त्यांच्याकडून किंमती दागिने, कपडे घालून पुजेला यायला सांगत होती. एका निर्जनस्थळी ती पुजेसाठी महिलांना बोलवायची तिथं डोळे बंद करायला सांगून सायनाइडनं भरलेले पाणी पाजून त्यांचा काटा काढत होती आणि दागिने इतर किंमती वस्तू घेऊन पसार व्हायची. २००७ मध्ये तिने तीन महिन्यात ५ महिलांची हत्या केली.२०१२ ला सायनाइड मल्लिका पोलिसांच्या जाळ्यात अडकली. तिला आजीवन कारावासाची शिक्षा दिली असून सध्या ती बंगळुरुतील पाराप्पाना जेलमध्ये कैदेत आहे.