मुंबई - नुकतेच वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईकचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मलेशियाने नकार दिला असतानाच भारताला आता युएईने देखील धक्का दिला. यूएईत अटक झालेल्या कुख्यात गुंड छोटा शकीलचा साथीदार फारुख देवडीवालाला पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आले असून देवडीवालाची चौकशी करता यावी, यासाठी भारतीय तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्याला पाकच्या तपास यंत्रणांच्या ताब्यात दिल्याने भारतासाठी हा धक्का मानला जात आहे. यापूर्वी देखील कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक मुन्ना मुज्जकीर मुद्देसर ऊर्फ मुन्ना झिंगाडाचा ताबा घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक थायलंडला गेले होते. मात्र, त्यावेळी देखील पुराव्याअभावी भारताच्या पदरी अपयश पडले. त्यामुळे भारताच्या वाट्याला हा दुसऱ्यांदा नव्हे तर तिसऱ्यांचा अपयश आले आहे.
देवडीवाला हा छोटा शकीलचा अगदी जवळचा साथीदार म्हणून ओळखला जातो. तो शारजामध्ये लपून बसला होता. तो इंडियन मुजाहिद्दीनसाठीही काम करायचा. मे महिन्यात त्याला यूएईतील तपास यंत्रणांनी अटक केली होती. भारताने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी व्हावी, यासाठी इंटरपोलकडे पाठपुरावा केला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा प्रयत्नशील होत्या. दोन भारतीयांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याप्रकरणात देवडीवाला आरोपी आहे. देवडीवाला हा छोटा शकीलसाठी काम करायचा. देवडीवाला हा मूळ गुजरातचा असून तो काही काळ मुंबईतही वास्तव्यास होता. गुजरात दंगलीनंतर २ किलो आरडीएक्स पुरवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. २००३ मध्ये तो देशाबाहेर पळाला होता. गुजरात एटीएसने देखील त्याच्याविरोधात आरसीएन जारी केली आहे. गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक के.के.पटेल हे देवडीवालाचा ताबा मिळावा याकरिता स्वत: दुबईला गेले होते. मात्र पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीत आधीच धाव घेत देवडीवालाचा ताबा घेऊन टाकला होता. याबाबत खुलासा करण्यासाठी गुजरात एटीएसचे पोलीस उपअधीक्षक के.के.पटेल यांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही. मात्र,महाराष्ट्र एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी देवडीवाला याला पाकिस्तानच्या ताब्यात दिल्याबाबत काहीही माहिती नसून नवी दिल्लीत यासंदर्भात पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले.
मे महिन्यात देवडीवालाला अटक झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी तो भारतीय नागरिक असल्याचे पुरावे देखील यूएईला दिले होते. तर पाकिस्तानी तपास यंत्रणांनी देवडीवाला हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा केला होता. देवडीवाला हा पाकिस्तानी नागरिक असून त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट असल्याचा दावा पाकिस्तानी तपास यंत्रणांनी केला होता. अखेर दुबईने देवडीवालाचे पाकिस्तानकडे प्रत्यार्पण केले असून भारतासाठी हा तिसरा धक्काच म्हणावा लागेल. २००१ साली बँकॉक पोलिसांनी अटक केलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक मुन्ना झिंगाडाचा ताबा घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक थायलंडला गेले होते. मुन्नाचा ताबा मिळाल्यास दाऊद आणि भारताविरोधातील अनेक कारवाया उघडकीस येतील, या भीतीने पाकिस्ताननेही त्याचा ताबा मागितला होता. बँकॉक पोलिसांनी पुराव्याअभावी त्याला कोणाच्याही हाती सोपवलेले नाही. यावेळी मुन्नाचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ठोस पुरावे सोबत नेल्याचे सूत्रांनी सांगितले.
अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेला फैजल मिर्झाला जुहू येथील एटीएसने मे महिन्यात अटक केली होती. त्यानंतर चौकशीत फैजलने त्याचा लांबचा भाऊ फारूख देवडीवाला याने त्याला शारजा येथे बोलावून घेतले. पाकिस्तानमार्गे दुबईहून नैरोबीला जाणाऱ्या विमानात बसविले. फैसल नैरोबीला न जाता पाकिस्तानात कराची विमानतळावर उतरला. फारूक याने नेमून दिलेल्या हस्तकांच्या मदतीने तो कराची विमानतळातून बाहेर पडला. ‘आयएसआय’च्या दहशतवाद्यांनी त्याला थेट प्रशिक्षण केंद्रावर नेले अशी माहिती दिली होती. फैझल मिर्झाने आयएसआयच्या केंद्रात ‘दौरा ए आम’दर्जाचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले आहे. अद्ययावत शस्त्र चालविणे, बॉम्ब तयार करणे, गर्दीच्या ठिकाणी जाळपोळ तसेच आत्मघाती हल्ला करणे अशा प्रकारचे सुमारे दीड ते दोन आठवड्य़ांचे प्रशिक्षण फैसलने घेतले असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे फैजलला या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात देखील फारुखचाच हात असल्याचे उघड झाले आहे. तर जोगेश्वरीच्या प्रेमनगर परिसरात कुटुंबीयांसोबत राहणारा मुन्ना झिंगाडा हा दाऊद आणि छोटा शकीलचा अत्यंत विश्वासू हस्तक होता. १९९० यामध्ये त्याने जोगेश्वरीच्या युसूफ इस्माइल महाविद्यालयात शिक्षण घेताना वझीर नावाच्या गुंडाची हत्या केली होती. १९९६मध्ये एका हत्येत त्याचे नाव आल्याने तो गावी उत्तर प्रदेश येथे पळाला. सात महिन्यांनी पुन्हा मुंबईत परतल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी अटक करत त्याची आर्थर रोड तुरुंगात रवानगी केली होती.