Indore Hit and Run Video : चुकीच्या दिशेने (wrong side driving) जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यू कारने जोरात स्कूटरला धडक दिली. या भीषण घटनेत स्कूटरवरील दोन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मित्राच्या वाढदिवसाचा केक घेऊन बीएमडब्ल्यू कारमधून जात होता. राँग साईडने वेगात जात असताना आरोपीने समोरून येणाऱ्या तरुणींच्या स्कूटरला जोरात धडक दिली. दोघी उडून दूर पडल्या आणि ठार झाल्या.
इंदूर शहरातील खजराना परिसरात हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणींची ओळख पटली असून, दीक्षा जादौन (वय २५ वर्ष) आणि लक्ष्मी तोमर (वय २४ वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. त्या इंदूरमधील तुलसीनगरमध्ये राहत होत्या.
BMW Hit And Run : अपघात कसा घडला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील खजराना परिसरात १४ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही तरुणी गणेश मंदिर परिसरातील यात्रेतून घरी जात होत्या. स्कूटरवरून जात असताना चुकीच्या दिशेने वेगात येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने त्यांना उडवले.
अपघातानंतर परिसरात असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघात सीसीटीव्हीमध्ये झाला कैद
हा भयंकर अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्कूटरला बीएमडब्ल्यूने धडक दिल्यानंतर दोन्ही तरुणी हवेत उडाल्या आणि दूर जाऊन पडल्या.
Hit And Run प्रकरणातील आरोपी कोण?
बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. गजेंद्र प्रताप सिंह (वय २८ वर्ष) असे त्याचे नाव आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीने काही माहिती दिली. आरोपी मित्राच्या वाढदिवसाचा केक घेऊन जात होता. आरोपीने लवकर पोहोचण्यासाठी चुकीच्या दिशेने गाडी नेली. आरोपीने काही दिवसांपूर्वीच बीएमडब्ल्यू कार घेतली होती.