इंदूर : मध्य प्रदेशातील पोलिसांनी एका आरोपीला फसवणूकीच्या प्रकरणात अटक केली आहे. जो फक्त आठवी पास असून त्याला 5 भाषा येतात. हा आरोपी स्वत:ला फोनद्वारे क्रेडिट कार्ड विभागाचा (Credit Card Department) अधिकारी असल्याचे सांगून ग्राहकांना एक लिंक पाठवून त्यांच्याकडून ओटीपी मिळवायचा आणि ग्राहकाचे अकाऊंट खाली करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला जामतारा येथून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र डेनवाल नावाच्या पीडित व्यक्तीने इंदूर सायबर सेलकडे आपल्या फसवणुकीची तक्रार दिली. राजेंद्र यांचे क्रेडिट कार्ड चालत नव्हते. त्याचवेळी त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच, राजेंद्र यांना त्यांची समस्या विचारली आणि अडचण सोडवण्याचे आश्वासनही दिले.
त्यानंतर फोन करण्याऱ्या व्यक्तीने राजेंद्र यांना एक लिंक पाठवली आणि त्यांच्याकडून ओटीपी नंबर मिळविला. ओटीपी नंबर येताच या व्यक्तीने राजेंद्र यांच्या दोन वेगवेगळ्या खात्यातून दोन लाख रुपये काढून घेतले. जेव्हा खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज आला. यानंतर फसवणूक झाल्याचे राजेंद्र यांना समजले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
दरम्यान, राजेंद्र यांच्या तक्रारीनंतर इंदूर सायबर सेल तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला. हा तपास सुरू असताना आरोपी जामताडा येथे राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी जामताडाला जाऊन आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपीला इंदूरला आणण्यात आले.
पोलिसांनी या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव अतुल राणा असल्याचे सांगितले. तो जामताडा येथील रहिवासी आहे. तो आठवी पास असून त्याला पाच भाषा येतात. त्याची अजूनही चौकशी सुरू असून आणखी काही फ्रॉडची माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचबरोबर, सायबर सेलचे तपास अधिकारी आरएस तिवारी यांनी सांगितले की, आरोपी गावातील रहिवासी आहे. बंगळुरूला जाऊन तो आपल्या मित्रांसोबत लोकांची फसवणूक करत होता. तो फक्त 8वी पास आहे, पण त्याला 5 भाषा येतात. त्याच्या चौकशीत आणखी काही प्रकरणे उघड होऊ शकतात.