इंदूर - ऑनलाईन फसवणुकीसह ‘डिजिटल अरेस्ट‘चे वाढते प्रकार आज नित्याचे झाले आहेत. परंतु, रविवारी या गुन्हेगारांची ‘वेळच वाईट’ ठरली आणि त्यांनी केलेला कॉल थेट इंदूरच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश दंडोटिया यांना लागला. तोही त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना. या डिजिटल गुन्हेगारांनी त्यांना क्रेडिट कार्डच्या गैरवापराच्या आरोपावरून दोन तासांत अंधेरी पश्चिम पोलिस ठाण्यात हजर होण्यासही सांगितले. अन्यथा बँक खाते ब्लॉक होईल, असा इशाराही दिला.
...आणि त्याची बोबडी वळली
एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही. इतक्या तातडीने हजर राहू शकत नसल्याचे दंडोटिया यांनी सांगितल्यावर हा कॉल पोलिस ठाण्यात जोडतो असे सांगत दुसऱ्याशी कॉल जोडून दिला. त्या व्यक्तीने वरिष्ठांशी बोलून व्हिडिओ कॉलद्वारे जवाब नोंदवता येतो का ते पाहतो म्हणत पुन्हा कॉल लावला आणि चक्क पाेलिस अधिकाऱ्याच्या वेशात दंडोटिया समाेर दिसताच त्याची बोबडी वळली. त्याने हा व्हिडिओ कॉल लगेच कट केला.
मोदींनी केला होता ‘मन की बात’मध्ये उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीच ‘मन की बात’मध्ये डिजिटल अरेस्टवर भाष्य करीत ज्येष्ठ नागरिकांना जागरूक करावे, असे आवाहन केले होते.