नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये लग्नानंतर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक उच्चशिक्षित तरूणी तिच्या घरी दूध द्यायला येणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली. मोबाईलवर डिजीटल पेमेंट करता-करता दोघांचं सूत जुळलं आणि इतकंच नव्हे तर दोघांनी लग्नही केलं. मात्र, त्यानंतर तिचा पती हा अचानक गायब झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. तिचा पती हा शहर सोडून मुंबईला फरार झाला आहे, असे तपासात समोर आले आहे.
इंदूरच्या बाणगंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतू जोशी नावाच्या मुलीने तिच्याच पतीविरोधात तक्रार केली आहे. तक्रारीनंतर बाणगंगा पोलीस ठाण्यात पती हिमांशू जोशी याच्याविरुद्ध फसवणूक आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू जोशी हा नीतूच्या घरी दूध देण्यासाठी येत असे. याआधी दोघे कधीच बोलले नव्हते. पण, दूध दिल्यानंतर एक महिन्यानंतर नीतूने हिमांशूच्या नंबरवर डिजिटल पेमेंट केले. या पेमेंटसाठी दोघांनी एकमेकांचे नंबर सेव्ह केले. त्यानंतर हिमांशू कधी-कधी मुलीला मेसेज करायचा. या बहाण्याने दोघांमध्ये बोलणे सुरू झाले.
नीतू आणि हिमांशूमधील बोलणे वाढले आणि तिने़ दूध विक्रेत्या हिमांशू आणि नीतूचा एकमेकांवर जीव जडला. प्रेमानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि इतकेच नव्हे तर लग्नही केले. लग्न होईपर्यंत दोघांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती नव्हती. लग्न झाल्यानंतरही हिमांशूने पत्नी नीतूला एकदाही घरी नेले नाही. तो आपल्या पत्नीला वचन देत राहिला की लवकरच सर्व काही ठिक होईल आणि त्यानंतर दोघेही एकत्र राहू. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले. मात्र, एके दिवशी पती पत्नी नीतूला न सांगता अचानक गायब झाला. यानंतर नीतूने एअरपोर्ट रोडवरील हिमांशूचे घर गाठले. तर तिथे तो बाहेर असल्याची माहिती तिला त्याच्या कुटुंबीयांना दिली.
नीतू त्याला सतत फोन करत राहिली. मात्र, त्याने उत्तर दिले नाही. डिसेंबरमध्ये हिमांशूने फोन करून सांगितले की, तो कामानिमित्त मुंबईत आहे आणि लवकरच परत येईल. मात्र, यानंतरही तो सतत खोटे बोलत राहिला. त्यानंतर त्याने नीतूसोबत बोलणेही बंद केले. अनेक प्रयत्न करूनही हिमांशूकडून प्रतिसाद न आल्याने अखेर ती नातेवाईकांकडे गेली. मात्र, कुटुंबीयांनीही समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर नीतूने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तपासानंतर प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.