पत्नीने मतदार स्लिप मागितल्याने पती संतापला अन् दिला तिहेरी तलाक, तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:43 PM2022-07-08T19:43:13+5:302022-07-08T19:43:45+5:30
indore case : याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. हे प्रकरण इंदूरच्या एमआयजी कॉलनीमधील आहे.
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेने पतीकडे मतदार स्लिप मागितली असता तिने महिलेला तीनदा तलाक म्हणत वैवाहिक संबंध संपुष्टात आणले. आता याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. हे प्रकरण इंदूरच्या एमआयजी कॉलनीमधील आहे.
याप्रकरणी इंदूरच्या एमआयजी कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने पतीविरोधात पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मतदानाच्या दिवशी पतीने तिला मतदानाचा अधिकार नाकारल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच, बीएलओने मतदानाची स्लिप पती राहत असलेल्या घरी पाठवल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
ही महिला गेल्या 4 महिन्यांपासून तिच्या माहेरच्या घरी राहत होती. मात्र, मतदानाची स्लिप पती राहत असलेल्या घरी होती. त्यामुळे महिलेने पतीच्या घरी जाऊन पतीकडे मतदानाची स्लिप मागितली. यावेळी महिलेला पाहून पतीने तिहेरी तलाक म्हणत वैवाहिक संबंध संपवले.
दरम्यान, पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती आहे. पत्नीने फ्लॅट आपल्या नावावर करावा अशी पतीची इच्छा होती. माझा फ्लॅट नावावर करण्यासाठी पती सतत माझ्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
याप्रकरणी महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत इंदूरचे आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. एमआयजी स्टेशन प्रभारी अजय वर्मा वस्तुस्थितीच्या आधारे तपास करत आहेत.
तसेच, पोलीस सध्याच्या आणि मागील प्रकरणांचा तपास करत आहेत. मात्र, तिहेरी तलाकचे खरे प्रकरण काय आहे? आणि त्यामागचे मुख्य कारण म्हणजे मतदानाची स्लिप आहे किंवा घरातील वाद आहे, हे तपासानंतर स्पष्ट होईल.