इंदूर: हॉटेलमध्ये गरम तंदुरी रोटी न मिळाल्यानं संतापलेल्या गुंडांनी धुमाकूळ घातला आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर येथील खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. थंड तंदुरी रोटी देण्यात आल्यानं गुंडांनी खाना खजाना हॉटेलमध्ये गोंधळ घातला. आरोपी चाकू घेऊन हॉटल व्यवस्थापकाला मारायला धावले. व्यवस्थापकानं कसाबसा स्वत:चा जीव वाचवला.
गुंडांनी हॉटेलमध्ये घातलेल्या गोंधळाची, तिथे केलेल्या नुकसानाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी सुरुवातीला आरोपींना सोडून दिलं. रविवारी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई सुरू केली.
खजनारा पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश वर्मांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा गुंड रफिक परदेशी उर्फ पावडर आणि त्याचा मुलगा खजरानातील जमजम चौकातील एका हॉटेलमध्ये जेवण आणण्यासाठी गेले होते. यावेळी हॉटेल व्यवस्थापकानं रफिकला थंड तंदुरी रोटी दिली. त्यामुळे रफिक आणि त्याचा मुलगा संतापला. त्यांनी चाकू काढून व्यवस्थापकाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानं तिथून पळ काढत कसाबसा स्वत:चा जीव वाचवला.
हॉटेलमधून निघाल्यानंतर रफिकनं काही लोकांना चाकू दाखवून घाबरवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी दोघे तिथून पळून गेले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यात रफिकसह त्याचे काही साथीदारदेखील दिसत आहेत. रफिकनं हॉटेलमध्ये ठेवलेलं सगळं सामान फेकून दिलं. जेवणाचं साहित्य अस्तावस्त टाकून दिल्याचं यात दिसत आहे. रफिकवर पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत.