नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका तरुणीवर बलात्कार करुन, तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची भयंकर घटना समोर आली आहे. फक्त पैसेच नाहीत तर सोन्या-चांदीचे दागिने देखील घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पीडितेच्या भावाने काही पैसे काढण्यासाठी आपली तिजोरी उघडली, तेव्हा तिथले पैसे गायब झाल्याचं त्याच्या लक्षात आले. यानंतर हा सर्व भयंकर प्रकार उघड झाला. आरोपीने तरुणीकडू एक कोटींहून अधिक रोख रक्कम, तीन किलो सोनं आणि 15 किलो चांदीचे दागिने उकळले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पीडितेने चौकशीदरम्यान पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी इंदूरमध्ये पीडितेची आरोपीशी ओळख झाली. निशित उर्फ मयूर बाफना असं नाव असलेला हा तरुण पीडितेच्या घरापासून दूर असणाऱ्या बडावदा गावात राहत होता. त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली. 2019च्यामार्चमध्ये ही तरुणी घरी आली होती. तेव्हाच आरोपी निशितही तिच्या घरी आला, आणि तिला कोल्डड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिचे काही आक्षेपार्ह फोटोही घेतले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुढे निशित तिच्याकडून पैसे उकळत राहिला.
आपली बदनामी होईल या भीतीने तरुणीने तिजोरीतून दागिने आणि काही पैसे काढले. आरोपी हा विवाहित असल्याची माहिती तरुणीने दिली आहे. तसेच आरोपीने तरुणीला कुटुंबीयांकडून कसे पैसे घ्यायचे हे देखील शिकवलं. आरोपीच्या सांगण्यावरून तरुणीने कुटुंबीयांना पैसे आणि दागिने डबल होतील याबाबत सांगितलं. एकदा काही कामानिमित्त तरुणीच्या वडिलांनी आणि भावाने तिजोरी उघडून पाहिली तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी मुलीकडे याबाबत कसून चौकशी केली असता तिने हा भयंकर प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला.
पीडितेच्या घरच्यांनी यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, निशित उर्फ मयूर बाफना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे. याबाबत बँक रेकॉर्ड्स आणि इतर गोष्टींची तपासणी सुरू आहे. यामध्ये निशितसोबत आणखी कोणी सामील असल्याचे समजल्यास त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तरुणीने आरोपीच्या बँक खात्यात देखील काही रक्कम ट्रान्सफर केली होती. त्याचाही पोलीस तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.