नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 5 महिन्यांत तुटलं आहे. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन तरुणाने प्रेमविवाह केला पण त्यानंतर टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. इंजिनिअर असलेल्या तरुणाने पाच महिन्यांपूर्वीच लग्न केलं होतं. मात्र त्यानंतर वाद होत असल्याने त्याने विष घेऊन स्वत:ला संपवलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूरच्या द्वारकापुरी पोलीस ठाणे हद्दीत राहणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर सौरभ शिंदे यांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेनंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलीस ठाण्याचे प्रमुख सतीश द्विवेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना जिल्हा रुग्णालयाकडून याबाबत सूचना मिळाली होती. पाच महिन्यांपूर्वी जया नावाच्या तरुणीसोबत त्याचं लग्न झालं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं, त्यामुळे ते कुटुंबापासून वेगळे राहत होते.
मैत्री, प्रेम, लग्न अन् 5 महिन्यांचा संसार
सौरभचे वडील सुभाष शिंदे यांनी आरोप केला होता की, तरुणी जया आणि सौरभ यांनी 19 जुलै 2021 रोजी प्रेम विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. सौरभ आणि जया यांनी लग्न केलं. ते दोघेही द्वारकापुरी भागात एका भाडेतत्वावर घेतलेल्या घरात राहत होते. लग्नानंतर एकदा सौरभने आपल्या वडिलांना फोन केला होता. फोनवर सौरभने त्याची प्रकृती बिघडत असल्याचं सांगितलं. मात्र सौरभच्या वडिलांना तो कुठे राहतो याबाबतही माहिती नव्हती.
लव्ह स्टोरीचा 'असा' झाला भयंकर शेवट
सौरभच्या वडिलांनी आरोप केला आहे की, सौरभच्या आत्महत्येमागे त्याची पत्नी जयावर संशय आहे. कारण जया त्याच्यावर संशय घेत होती, आणि त्याला नोकरीवर जाऊ देत नव्हती. तरुणी सौरभला मारहाणदेखील करीत असे. याशिवाय त्याला जेवणही देत नव्हती. या सर्वांमुळे सौरभने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणात सतीश द्विवेदी यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल. मात्र प्राथमिक तपासानुसार सौरभने विष खाऊन आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.