कोरोना साथीच्या दुसर्या लाटेला तोंड देत असताना उत्तर प्रदेशमधील एटाहून एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कारागृहातील ९० वर्षांच्या कैद्याला श्वास घेताना त्रास होत होता म्हणून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तुरूंग प्रशासनाने अमानुष वर्तन करत कैद्याला उपचारादरम्यान बेडवर साखळीने बांधले. कैदी पळून जाईल या भीतीने हे कृत्य केले गेले होते, परंतु ९० वर्षांच्या कैद्याबरोबर अशा अमानुष वर्तनाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. साखळी बांधलेल्या बेडवरील कैद्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एटा जिल्हा कारागृहातील जेलर कुलदीपसिंग भदौरिया यांनी सांगितले की, हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ९२ वर्षीय बाबूराम बलवान सिंग ९ मे रोजी आजारी पडला आणि त्याला श्वासोच्छवासाची तीव्र समस्या येऊ लागली. त्यांना जिल्हा रुग्णालय एटा येथे उपचारासाठी आणले गेले, तेथून डॉक्टरांनी अलीगड मेडिकल कॉलेजला पाठवले, परंतु अलीगडमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना १० मे रोजी एटा जिल्हा रुग्णालयात नॉन कोविड वॉर्डमध्ये परत दाखल करण्यात आले. पुढे अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णालयात कैद्यासोबत ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने वयोवृद्ध कैद्याच्या एका पायाला बेडी लावली आणि दुसर्या टोकाला बेडला साखळ्याने बांधून कुलूप लावले.
प्रकरण उजेडात आल्यानंतर जेल प्रशासनाचे डीजी आनंद कुमार यांनी घटनेची दखल घेत संबंधित तुरूंगातील वॉर्डर अशोक यादव यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. यासह पर्यवेक्षणीय अधिकाऱ्याकडून याबाबत स्पष्टीकरणही मागविण्यात आले आहे. DG PRISONS U.P या ट्विटर हँडलवरील कारवाईची माहिती देताना असे म्हटले आहे की, दोषी ठरविण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा कर्मचाऱ्याला सोडले जाणार नाही. माहिती मिळाल्यानंतर कैद्याला बेडसोबत लावलेली साखळी उघडण्यात आली आहे.