उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरने हिंदू मुलाचा खतना करत धर्म परिवर्तन केल्याचा गंभीर आरोप डॉक्टरवर लावण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबाने डॉक्टरांची पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तर, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत.
एक हिंदू परिवार आपल्या मुलाच्या जीभचं ऑपरेशन करण्यासाठी बारादरी येथील डॉ. एम. खान हॉस्पिटल पोहोचला होता. मात्र, डॉक्टरांनी रुग्ण असलेल्या मुलाच्या पालकांच्या परवानगीशिवाय मुलाचा खतना केला. त्यामुळे, मुलाच्या कुटुंबीयांना संताप अनावर झाला. तसेच, डॉक्टरांच्या या कृत्यामुळे पायाखालची वाळू सरकल्याचा धक्का त्यांना बसला. त्यामुळे, पीडित कुटुंबाने रुग्णालयातच गोंधळ सुरू केला.
या घटनेची माहिती मिळताच काही हिंदू संघटनांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर रुग्णालयात काही तास चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. त्यानंतर, कुणीतरी पोलिसांना माहिती देताच, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन चौकशीचे आदेशही दिले.
पीडित कुटुंबाने आरोप केला आहे की, आम्ही मुलाच्या जीभेचं ऑपरेशन करण्यासाठी येथे आलो होतो. मात्र, डॉक्टराने आम्हाला न विचारताच मुलाचा खतना केला. याबाबत आम्हाला विचारपूसही करण्यात आली नाही. आरोपी डॉक्टरविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे पीडित कुटुंबाने म्हटले आहे.
दरम्यान, आरोपी डॉक्टर मोहम्मद जावेद यांनी म्हटले की, मुलाचे वडिल मुलाला घेऊन रुग्णालयात आले होते. मुलाला युरिन इन्फेक्शन होते, त्यामुळे त्यांना सोमवारी बोलावलं. पण, ते शुक्रवारी आले आणि कन्सल्ट घेऊन ऑफरेशनही केले. मात्र, आम्हाला ऑपरेशन करायचे नव्हते, असे त्यांनी सर्जरी झाल्यानंतर सांगितले, असे डॉक्टर जावेद यांनी म्हटलं आहे.