मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विशेष न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर १५ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश ईडीला न्यायालयाने दिले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फेब्रुवारीमध्ये ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच नियमित जामीन अर्ज विशेष न्यायालयात दाखल केला आहे. न्यायालयाने ईडीला मलिक यांच्या जामीन अर्जावर १५ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत मलिक यांनी प्रकृतीच्या कारणास्तव व अन्य कारणास्तव न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांना उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मुभा विशेष न्यायालयाने दिली होती. ईडीने मलिक यांच्यावर आरोपपत्रही दाखल केले आहे. ‘नवाब मलिक यांनी दाऊद टोळीच्या सदस्य असलेल्या हसरीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांच्याशी संगनमत करून मुनिरा प्लंबरच्या मालकीची गोवाला कंपाऊंडची मालमत्ता हडपण्याचा गुन्हेगारी कट रचला. कुर्ला येथील मालमत्ता हडपण्याचे कृत्य हे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत (पीएमएलए) गुन्हा आहे.
मलिक हे आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात थेट आणि हेतूपूर्वक गुंतलेले आहेत, हे दर्शविणारा प्रथमदर्शनी पुरावा आहे,’ असे न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेताना म्हटले आहे.