जामनगर: गुजरातच्या जामनगरमध्ये दुहेरी हत्याकांड घडलं आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या आंतरजातीय विवाहातून हा संपूर्ण प्रकार घडला. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानं मुलीच्या घरातील सदस्यांनी मुलाला संपवलं. त्याचा बदला घेण्यासाठी मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या आईचा जीव घेतला. त्यामुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील आरोपींना अटक केली आहे.
गुजरातच्या जामनगरमधील हापा योगेश्वर धाम परिसरात वास्तव्यास असलेल्या २३ वर्षांच्या सोमराजनं त्याच परिसरात राहात असलेल्या रुपलखासोबत प्रेम विवाह केला. मुलगा चारण समाजाचा, तर मुलगी क्षत्रिय समाजाची आहे. दोन्ही कुटुंबांना लग्न मंजूर नव्हतं. लग्नामुळे रुपलेखाचे कुटुंबीय संतप्त झाले. ते सोमराजचा शोध घेत होते. सोमराज राजकोट रोडवर असलेल्या अतुल शोरूमजळ उभा असल्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली. ते तिथे पोहोचले आणि धारदार शस्त्रांनी सोमराजवर हल्ला केला.
यामुळे संतापलेल्या सोमराजच्या घरातील सदस्यांनी रुपलेखाच्या घरावर हल्ला केला. घरात रुपलेखाची आई अनिता होती. सोमराजच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. प्रेम विवाहामुळे हा प्रकार घडल्याचं जामनगरचे पोलीस अधीक्षक प्रेमसुख डेलू यांनी सांगितलं. दोन्ही कुटुंबातील आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.