राजकुमार जोंधळे
लातूर - जिल्ह्यात विविध ठिकाणाहून पशुधनांची चाेरी करणाऱ्या आंतरराज्य टाेळीतील कुख्यात आठ जणांना तब्बल ३५० किलाेमीटर सिनेस्टाईल पाठलाग करुन जेरबंद केले. त्यांच्याकडून चाेरीतील पशुधन, टेम्पाे आणि माेटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
साेमवारी पहाटे अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत टेम्पाेत काही लोक रस्त्यावर माेकाट पशुधन भरताना आढळून आले. यावेळी चाैकशी केली असता, टेम्पो भरधाव निघून गेला. त्यानंतर पाेलिसांचा संशय अधिक बळवला. यावेळी पोलीस नियंत्रण कक्ष, लातूरला याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना अलर्ट करण्यात आले. पशुधनाने भरलेला टेम्पो किनगावच्या दिशेने भरधाव गेल्याने अहमदपूर पोलिसांच्या मदतीसाठी किनगाव पोलीस आले. किनगाव पोलिसांनी भरधाव असलेला टेम्पोला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, टेम्पो न थांबता ताे तसाच धर्मापुरीच्या दिशेने निघून गेला. किनगाव, अहमदपूर पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला. टेम्पो परळी, गंगाखेड मार्गे राणी सावरगावच्या दिशने सुसाट गेला. राणी सावरगाव पाेलिसांनी नाकाबंदी केली. पोलीस व्हॅन आडवी लावून तो टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आपला पाठलाग सोडणार नाहीत, हे लक्षात आल्याने चोरट्यांनी टेम्पो रस्त्यावरच सोडून खंडाळी शिवारात उसाच्या फडात पळून गेले. यावेळी तिघांना ताब्यात घेतले. तर इतर पाच जणांनाही अटक केली. त्यांनी फक्रुद्दीन अब्दुल रहीम, ताहीर रोशन, मोहम्मद रफी शमशुद्दीन, मुफिद आसू, आरिफखान फारुख (रा. हरियाणा), शेख रफिक शेख हबीब, शेख साबिर शेख पाशा, शेख जाकीर शेख पाशा (रा. परभणी) अशी नावे सांगितली. त्यांनी जिल्ह्यासह राज्यभरात पशुधनांची चोरी केल्याची कबुली दिली.याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सपोनि. रामचंद्र केदार, विठ्ठल दुरपडे, सपाेनि. शैलेश बंकवाड, विक्रम हराळे, सपोनि. सुनील माने, सपोनि. मुंडे, पोउपनि. प्रभाकर अंदोरीकर,अंमलदार सुशीलकुमार माने, सुहास बेंबडे, तानाजी आरादवाड, किशोर सोनवणे, सुदर्शन घुगे, विशाल मुंडे, बाळू मगर, नामदेव राठोड, चामे, शिंदे, पांचाळ,शेख, आलापूरे, साळवे, यांच्या पथकाने केली.