औरंगाबाद : बनावट धनादेश तयार करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीने मे महिन्यात वर्धा येथेही एका स्टील उद्योजकाच्या बँक खात्यातून ५ लाख ४३ हजार रुपये पळविले होते. या गुन्ह्यात वर्धा पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने शुक्रवारी टोळीतील पाच आरोपींना अटक केली.
दहा दिवसांपूर्वी शहर गुन्हे शाखेने दहा दिवसांपूर्वी या रॅकेटचा पर्दाफाश करून सहा जणांना अटक केली होती. या टोळीला बनावट धनादेश पुरविणाऱ्या आरोपीचा गुन्हे शाखा शोध घेत आहे.मनीषकुमार मौर्या ऊर्फ राकेश, ऊर्फ मनीष यादव ऊर्फ अमित, मनदीपसिंग, रशीद खान, डबलू शेख आणि इसरार खान, अशी वर्धा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुंडलिकनगर परिसरातील पारिजातनगर येथील एका खाजगी बँकेत बनावट धनादेश जमा करून टोळीने ३ लाख ९३ हजार रुपये काढले होते. शिवाय आणखी ४ लाख ८० हजार ६०० रुपयांचा बनावट धनादेश जमा करून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि उपनिरीक्षक अनिल वाघ यांच्या पथकाने या रॅकेटच्या मुंबई आणि सिंधुदुर्गमधील कुडाळ येथे जाऊन मुसक्या आवळल्या होत्या.
२७ जून रोजीपासून आरोपी गुन्हे शाखेच्या कोठडीत होते. या टोळीने बनावट धनादेश तयार करून आतापर्यंत विविध राज्यांत कोट्यवधींचा गंडा घातल्याचे समोर आले. वर्धा येथील एका स्टील उद्योजकाचा बनावट धनादेश तयार करून रॅकेटने ५ लाख ४३ हजारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी मे महिन्यात गुन्हा नोंद झाला होता, तेव्हापासून आरोपी पोलिसांना ‘वाँटेड’ होते. दरम्यान, औरंगाबाद शहर गुन्हे शाखेने या बनावट धनादेशाद्वारे फसवणूक करणारे रॅकेट पकडल्याची माहिती वर्धा पोलिसांना मिळाली. वर्धा पोलीस दलातील उपनिरीक्षक गावडे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांचे पथक आज औरंगाबादेत आले होते. त्यांनी न्यायालयाच्या परवानगीने पाच आरोपींना अटक करून वर्धा येथे नेले.
मुख्य आरोपीचा शोध सुरूअटकेतील आरोपींना बनावट धनादेश देणाऱ्या ओम श्रीवास्तव नावाच्या आरोपीचा गुन्हे शाखा शोध घेत आहे. तो सारखा ठिकाण बदलत असतो. यामुळे तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसल्याचे गुन्हे शाखेकडून समजले. त्याला अटक केल्यानंतरच तो बनावट धनादेश कशाप्रकारे तयार करीत असे आणि मोठ्या कंपन्यांना कोणत्या क्रमांकाचे धनादेश बँकेने अदा केले, याबाबतची माहिती तो कशी मिळवीत होता, हे समोर येईल.