परमबीर सिंग यांना 'अंतरिम' दिलासा; १५ जूनपर्यंत ना अटक, ना कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 05:08 PM2021-06-10T17:08:14+5:302021-06-10T17:15:53+5:30

Parambir Singh :तोपर्यंत परमबीर यांची ठाणे पोलीस करत असलेला गुन्हा रद्दबातल करण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Interim relief to Parambir Singh; No arrests or strict action till June 15 | परमबीर सिंग यांना 'अंतरिम' दिलासा; १५ जूनपर्यंत ना अटक, ना कठोर कारवाई

परमबीर सिंग यांना 'अंतरिम' दिलासा; १५ जूनपर्यंत ना अटक, ना कठोर कारवाई

Next

ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीदरम्यान अंतरिम दिलासा दिला होता. ९ जूनपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात १५ जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही किंवा कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही  राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत परमबीर यांची ठाणे पोलीस करत असलेला गुन्हा रद्दबातल करण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी सोमवारी घेण्यात येईल. 

या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे  होती. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १४ जूनपर्यंत तहकूब केली.  अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार केल्याने सरकार सूडबुद्धीने आपल्यावर गुन्हे दाखल करत आहे. खोट्या प्रकरणांत आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सिंह यांनी याचिकेद्वारे केला आहे. 
आपल्यावरील गुन्हा रद्द करावा आणि याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत आपल्यावर कठोर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी सिंह यांनी याचिकेद्वारे केली आहे.  दरम्यान, राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी सिंग यांना १५ जूनपर्यंत अटक न करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले.


अकोल्यात  बदली केलेले पोलीस भीमराव घाडगे यांनी सिंग यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवरून सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग यांची ठाण्यात बदली करण्यात आली तेव्हा ते व अन्य काही पोलिसांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा आरोप घाडगे यांनी केला आहे. घाडगे यांनी अकोला येथे सिंह यांच्याविरोधात तक्रार केली. अकोला पोलिसांनी 'झिरो एफआयआर' नोंदवून पुढील तपास ठाणे पोलिसांकडे वर्ग केला. ठाणे पोलीस आयुक्तालयात कामाला असताना घाडगे यांना सिंग यांनी एका प्रकरणातील काही आरोपींची नावे वगळण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी तसे न केल्याने सिंग यांनी त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले.  
घाडगे यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सिंह यांच्यावर  आयपीसी अंतर्गत कट रचणे, पुरावे नष्ट करणे व अत्याचार प्रतिबंधक कायद्यातलेही काही कलम लावले.

 

याआधी झालेल्या सुनावणीत सिंग यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं, अशी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली होती. भिमराव घाडगे यांना एका खोट्या चकमक प्रकरणी परमबीर सिंग यांनी अडकविले होते. काही बिल्डरांना गुन्ह्यातून वाचविण्यास परमबीर सिंग यांनी घाडगे यांना सांगितले होते. परंतु त्या बिल्डरांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना वाचवू शकत नाही, असे सांगत घाडगे यांनी परमबीर सिंग यांना नकार दिला होता. घाडगे हे आपले ऐकत नसल्याने परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरुध्द कट रचला होता. एका खोट्या चकमकीच्या गुन्ह्यात त्यांना अडकविले होते. नंतर या प्रकरणाचा तपास झाला आणि त्या गुन्ह्यातून न्यायालयाने भिमराव घाडगे यांना निर्दोष सोडले होते. 

घाडगे दांपत्याचे अंडा सेलमध्ये सव्वा वर्ष 

परमबीर सिंग यांच्या जवळच्या सहा व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचे पुराव्यासहती गुन्हे दाखल केल्यामुळे घाडगे यांच्यावर तत्कालीन ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी  खोटे गुन्हे दाखल केले होते. एवढेच नाही तर घाडगे यांना त्यांच्या पत्नीसह एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखे किंवा आतंकवादी असल्यासारखे दाखवून त्यांना नवी मुंबई येथील तळोजा कारगृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. कोणताही गुन्हा नसताना घाडगे आणि त्यांच्या पत्नीने एक वर्ष दोन महिने अंडासेलमध्ये घालविले.


२७ पोलीस अधिकारी जाळ्यात...
मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Read in English

Web Title: Interim relief to Parambir Singh; No arrests or strict action till June 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.