नवी मुंबई - नवी मुंबईच्या पनवेल गुन्हे शाखा कक्ष - २ यांनी शिताफीने मुंबई पुणे महामार्गावर प्रवाश्यांना बंदुकीचा धाक दाखवून लुटणारी आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी तीनही आरोपी दिल्लीमधील राहणारे असून एकाला मुंबई विमानतळ येथून आणि दोघांना दिल्ली येथे सापळा लावून अटक करण्यात आली आहे.या अटक सराईत गुन्हेगारांकडून १५६ ग्राम सोने आणि गुन्हयात ऍक्सेंट ही मोट कार तसेच इतर मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे.
पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे तसेच सहायक पोलीस निरीक्षक शरद ढोले, संदीप गायकवाड़, बबन जगताप यांच्या मार्गदर्शखालील पथकाने ही कामगिरी केली आहे. गुरु चरण सिंग, अहमद हसन शेख आणि गुलबान जहर हसन यांना अटक केली असून हे तिघेही दिल्लीत राहणारे आहेत. अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक सुधीर जालनापूर यांना या टोळीने ४ लाखांना लुटलं होतं. तर नवी मुंबईतील हनुमंत अगवणे आणि वृत्तनिवेदक गिरीश निकम, ठाण्यातील अभियंता प्रदीप बामणकर आणि नेरुळमधील अभियंता संतोष राठोड यांना देखील आपलं शिकार बनवत लुटलं होतं. त्याचप्रमाणे आरोपींनी अमित काळे यांची पांढऱ्या रंगाची ऍक्सेंट ही कार वाहनचालकाला गुंगीचे औषध पाजून पळवली आणि त्याची नंबर प्लेट बदलून गुन्हे करताना वापरली होती.