मुंबई - ग्रीसमध्ये नोकरीनिमित्त राहत असलेल्या इसमाच्या क्रेडिट कार्डचे क्लोन करून मुंबईच्या माझगाव येथील एटीएममधून २ लाख १६ हजार रुपये काढल्याप्रकरणी तपास करताना पोलिसांना क्रेडिट डेबिट कार्डचे क्लोन करून त्याच्या माध्यमातून देश विदेशातून ग्राहकांचा खात्यातील पैसे घालून त्यांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आफ्रिकन नागरिकासह ६ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. कस्तुराराम तेजारामजी सोलंकी (वय ३०), मदनकुमार सुन्देसा (वय ३३), रमेश चंदन (वय ३१), दीपक गेहलोत (वय ३३), चंदनसिंग नरपतसिंग (वय २३) आणि कोलाहोले हकीम उर्फ आयो (वय ४८) या परदेशी नागरिकाला अटक केली आहे.
माझगाव येथील एटीएममधून क्लोन केलेल्या क्रेडिट कार्डद्वारे काढण्यात आलेल्य २ लाख १६ हजार रुपयांच्या फसवणुकीप्रकरणाची तक्रार नागपाडा पोलिसांत दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास मालमत्ता कक्षाने सुरू करून राजस्थान येथून एकाला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे भाईंदर, रे रोड व डोंगरी येथे सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. भाईंदर येथील इसमाकडून ३ लॅपटॉप, एटीएस स्कॅनर कॅबिनेट, मोबाईल, स्पॉस स्किमर, पेन ड्राईव्ह, ७० क्रेडिट डेबिट कार्ड हस्तगत केले. त्याचबरोबर त्याच्याकडे देश - परदेशातील अनेक नागरिकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डचा डेटा आढळून आला. डोंगरी येथून अटक केलेल्या आफ्रीकन नागरिकाकड़े १ लॅपटॉप, चार मोबाईल, क्रेडिट, डेबिट कार्ड, केनिया देशाचा पासपोर्ट आढळून आला असून तो क्रेडिट डेबिट कार्डचा डाटा इतर आरोपींना पाठवत असल्याचे उघड झाले आहे. कार्ड क्लोनिंग करण्यासाठी लागणारी मशनरी एख आरोपी चीन येथून पाठवत असल्याचे उघड झाले असून त्यावरून एकाला कोईमतूर, तामिळनाडू येथून एकाला अटक केली आहे.