मंगेश कराळे
नालासोपारा :- घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय त्रिकुटाला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला यश मिळाले आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपीकडून सहा गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेला काही मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी गुरुवारी दिली आहे.
धानिवबाग येथे राहणाऱ्या रामकुमार श्रीबसंत सिंग (२९) यांच्या घरी ६ ऑगस्टला रात्री अकराच्या सुमारास चोरट्याने घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश करत चार मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, कानातील रिंग असा ६० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. पेल्हार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यापासून घरफोडी चोरी, जबरी चोरीच्या प्रकारात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेऊन आरोपींचा शोध घेऊन पायबंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना तांत्रीक विश्लेषण व मिळालेल्या माहितीवरून आरोपी कय्युम झाकीर शेख (२०), लाला अझर शेख (१९) आणि मरिप्पा मुकुंद गजदाने (१९) यांना २२ ऑगस्टला ताब्यात घेतले. आरोपीकडे तपास केल्यावर त्यांनी सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने अटक केली आहे. आरोपीकडे अधिक तपास केल्यावर सहा गुन्ह्यांची उकल करून विविध गुन्हयातील ७५ हजार ५०० रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींवर अशाच प्रकारे पोलीस आयुक्तालय व पालघर येथे १० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सागर सोनवणे, गणेश यादव, प्रविण वानखेडे तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.