नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांच्या पत्नी अमी मोदी यांच्याविरुद्ध इंटरपोलने जागतिक अटक वॉरंट जारी केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) विनंतीनुसार इंटरपोलने वॉरंट जारी केले आहे.
फरार आरोपीविरुद्ध एकदा का अशी नोटीस जारी करण्यात आल्यास इंटरपोल १९२ सदस्य देशांना ही व्यक्ती त्यांच्या देशात आढळल्यास त्या व्यक्तीला अटक करण्यास किंवा ताब्यात घेण्यास सांगते. त्यानंतर प्रत्यार्पण किंवा हद्दपार करण्याची कार्यवाही सुरू केली जाऊ शकते.
२०१८ मध्ये दोन अब्ज डॉलरहून अधिकचा पीएनबी घोटाळा उजेडात आल्यानंतर अमी मोदी यांनी देश सोडला होता, असे सांगण्यात येते. ईडीने नीरव मोदी, मेहूल चोकसी आणि इतरांशी कट करणे आणि मनी लाँड्रिंगचा आरोप अमी मोदीवर केला आहे. मार्च २०१९ मध्ये अटक केल्यापासून नीरव मोदी सध्या ब्रिटनमधील तुरुंगात आहे. त्यांच्याविरुद्ध सध्या प्रत्यार्पणाची कार्यवाही सुरू आहे. मुंबईतील कोर्टाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे.