मंगेश कराळे
नालासोपारा () :- घरफोडी, चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीला गोवा राज्यातील म्हापसा येथून ताब्यात घेतले असून १२ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी दिली आहे.
वसईच्या दिनदयाळ नगर मधील युनिक पार्क येथे राहणाऱ्या रहीम इस्माईल डायअथर (६०) यांच्या घरी १ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करत १ लाख ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. माणिकपुर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये सतत होणाऱ्या घरफोडी चोरींचे प्रमाण वाढत असल्याने घरफोडयांवर आळा घालणेबाबत वरीष्ठांनी आदेश दिले. त्या अनुषंगाने घडणाऱ्या प्रत्येक घरफोडीच्या गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण गुन्हे शाखेच्या युनिट दोनने केले. दिवसा घरफोडी चोरीच्या गुन्हयांतील सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीला निष्पन्न करुन गोवा येथून ताब्यात घेवून तपास केल्यावर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. रोहीत उर्फ अरहान चेतन शेट्टी (२१) असे आरोपीने नाव आहे. आरोपीकडून माणिकपुर येथील १, विरार येथील ६, तुळींज येथील ३, पेल्हार येथील १, नायगाव येथील १ असे एकुण १२ घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहे.
अटक आरोपीकडून उघडकीस आणलेल्या घरफोडीच्या १२ गुन्हयात १५ तोळे सोने, २ चांदीच्या समई, २ चांदीचे पैजण, चांदीची जोडवी, १० चांदीची नाणी, १५ हजार रुपये रोख रक्कम, १ मोबाईल आणि आयफोन तसेच रीअल मी मोबाईलचे २ चार्जर असा एकुण ८ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी हा घरफोडीचे गुन्हयातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द मुंबईत घरफोडीचे १५ गुन्हे नोंद आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार संजय नवले, रमेश भोसले, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे आणि संतोष चव्हाण यांनी केली आहे.