- मंगेश कराळे
नालासोपारा : पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात लोकांना बोलण्यात गुंतवून एटीएमची अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या आंतरराज्य टोळीला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे. या टोळीकडून १६ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.
संतोष भवन येथे राहणारे हरीलाल यादव (४४) हे ९ डिसेंबरला आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी असलेल्या चार आरोपींनी गोंधळ घालून व बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून दुसऱ्या बँकेचे एटीएम दिले. त्यांचे एटीएम कार्ड घेऊन आरोपींनी त्याच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून फसवणूक केली. पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आयुक्तालयाच्या परीसरात गेल्या काही महिन्यांपासून एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व आरोपींना पकडून गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या.
पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसानी तांत्रिक माहितीवरून आरोपी निष्पन्न केले. परंतु, आरोपीत हे वारंवार त्यांचे वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने मिळून येत नव्हते. ते आरोपी हे स्विप्ट कारने मध्यप्रदेशमार्गे महाराष्ट्रात येत असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील यांना मिळाली. त्यांनी ही माहिती शिरपूरचे पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना देवून त्यांच्या मदतीने आरोपी विकी पंडीत साळवे (३२), विकी राजु वानखेडे (२२), अनिल कडोबा वेलदोडे (२९) आणि वैभव आत्माराम महाडीक (३४) या चौघांना धुळ्यात पकडले. आरोपींच्या अंगझडती दरम्यान त्यांच्याकडे वेगवेगळया बँकाचे एकुण ९४ एटीएम कार्ड, गुन्हयात मिळून आलेल्या रक्कमेतून खरेदी केलेली एक स्विप्ट कार, रोख रक्कम ८९ हजार व वेगवेगळया कंपनीचे ३९ हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन असा एकुण ५ लाख २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
चारही आरोपींना २७ जानेवारीला अटक करुन ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे. पोलीस कोठडीत आरोपींकडे सखोल चौकशी केल्यावर १६ गुन्ह्यांची उकल झाली आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र शेलार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तुकाराम माने, तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर, अमोल तारडे, नामदेव ढोणे यांनी केली आहे.
- कोणाची अशा प्रकारे फसवणुक झाली असल्यास त्यांनी तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करावी. - सुहास बावचे (पोलीस उपायुक्त)