नागपूर - देशातील विविध भागात मोबाईल चोरून ते नेपाळ, पाकिस्तान, भूतान, बांगलादेशसह विविध देशात विकणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा छडा अंबाझरी पोलिसांनी लावला. बिहारमधून या टोळीतील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. समीर साहा उर्फ चेलवा मुस्तफा देवान (वय ३४) आणि सलमान साहाउर्फ बैला मुस्तफा देवान (वय ४३)अशी आरोपींची नावे आहेत. ते बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील पोकाई टोला घोडासहन येथील रहिवासी आहेत.
कॉफी हाऊस चौकाजवळच्या वन प्लस या मोबाईल शॉपीत १४ ते १५नोव्हेंबरच्या रात्री धाडसी चोरी झाली होती. चोरट्यांनी येथून २७ लाख, ४२ हजारांचे मोबाईल चोरून नेले होते. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी चोरट्यांचे लोकेशन इंदोरमध्ये दिसले. सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपींचे चेहरेही आंतरराज्यीय टोळीतील चोरट्यांशी मिळतेजुळते असल्याने पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी अंबाझरी पोलिसांचे एक पथक इंदोरकडे रवाना केले. तेथून आरोपी बिहारच्या चंपारण्यात असल्याचे लक्षात आले. तेथे पोहचल्यावर आरोपी कारागृहात बंदीस्त असल्याचे कळले. त्यांना आवश्यक कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी आरोपी समीर आणि सलमानला ताब्यात घेतले.
शुक्रवारी या दोघांना नागपुरात आणण्यात आले. आरोपी समीर आणि सलमान तसेच त्यांचे साथीदार चोरलेले मोबाईल नेपाळ, पाकिस्तान, भूतान, बांगलादेशमध्ये विकत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरीचे ठाणेदार अशोक बागुल, सहायक निरीक्षक अचल कपूर, उपनिरीक्षक साई केंद्रे, दीपक अवचट, अंकुश घटी, अमीत भुरे, प्रशांत गायधने, सतिश कारेमारे आणि अंमलदार नीतेश यांनी ही कामगिरी बजावली.
विविध राज्यात गुन्हे दाखलआरोपी समीरविरुद्ध १८ तर सलमानविरुद्ध ९ गुन्हे दाखल आहेत. तर, ते ज्या टोळीत काम करतात त्या टोळीविरुद्ध राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, झारखंड,पश्चिम बंगाल, छत्तीसगडसह विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते.