मंगेश कराळे
नालासोपारा :- बांधकाम व्यवसायिकाला सोन्याची नाणी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीमने पकडले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यातील फसवणूक केलेल्या रकमेपैकी दोन करोड अठरा लाख पंच्याणव हजार रुपये हस्तगत केले आहे. गुन्हे विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अमोल मांडवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
मुंबईच्या डोंबिवली येथे राहणारे ४० वर्षीय बांधकाम व्यवसायिक हेमंत वावीया (पटेल) यांची १८ एप्रिलला संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास फसवणूक झाली आहे. सकवार गावाच्या हद्दीतील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ऍपेक्स हॉटेलच्या समोरील एका झोपडीत आरोपींनी एका पिशवीत सोन्याची नाणी असल्याचे भासवून त्याबदल्यात ३ करोड १२ लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. विरार पोलिसांनी तक्रार आल्यावर ७ मे रोजी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यांनी वेगवेगळी पथके तयार करून बातमी दाराकडून माहिती मिळवून तसेच तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडले. किसनभाई मारवाडी सलाट, हरीभाई मारवाडी सलाट आणि मनिष शहा अशी तिन्ही आरोपींची नावे असून त्यांना अटक केले आहे.
सदर गुन्ह्यातील दोन आरोपींना उज्जेन आणि एकाला अहमदाबाद येथून ताब्यात घेत २१ जुलैला अटक केली आहे. तिघांना वसई न्यायालयात हजर केल्यावर २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - शाहूराज रणावरे (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट दोन)