नवी दिल्ली - आई-वडील आपल्या मुलांचे हट्ट पुरवतात. वेळप्रसंगी मुलांनी चूक केली तर त्यांना कठोर शिक्षा देखील देतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. त्रास देणाऱ्या मुलाला आईने आयुष्यभराची अद्दल घडवली आहे. दारुड्या लेकाची थेट तुरुंगात रवानगी केली आहे. बिहारच्या आरामध्ये एका आईने आपल्या मनावर दगड ठेवून सहा महिन्यांपूर्वी आपल्या दारूड्या मुलाला तुरुंगात पाठवलं होतं. सोमवारी 20 डिसेंबर रोजी विशेष न्यायालयाने त्याला 5 वर्षांच्या सक्त मजुरीच्या शिक्षेसह एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
शिक्षेबद्दल ऐकून आईला दु:ख झालं, मात्र मुलाला त्याच्या चुकीची शिक्षा व्हावी ही तिची इच्छा होती. रामावतीच्या तक्रारीनंतर दारूबंदी कायद्याअंतर्गत 25 वर्षाच्या आदित्य राज उर्फ बिट्टू याला शिक्षा झाली आहे. रामावती देवीचे पती बिपिन बिहारी यादव ग्रामीण बॅंकेत मॅनेजर होते. काही वर्षांपूर्वी ते या पदावरुन निवृत्त झाले होते. त्यांच्या कुटुंबात दोन मुली आणि दोन मुली आहेत. आदित्य सर्वात लहान आहे. त्यांनी सांगितलं की, तो माझ्यासोबत मारहाण करीत होता. दररोज पैशाची मागणी करायचा. जर पैसे दिले नाही तर वाईट शिव्या देत होता. मला खोलीत बंद करून गळा दाबण्याचा प्रयत्न करीत होता.
आईने पोलिसांकडे केली तक्रार
गेल्या 10 वर्षांपासून तो दारू पितो. आपल्या मित्रांसह घराच्या छतावर दारूची पार्टी करीत होता. दारू प्यायल्यानंतर बाटल्या घरात ठेवत होता. ज्यामुळे रामावतीला घरात राहणं अवघड झालं होतं. आई जेवायला बसली तर तिच्या हातातील ताट खेचून घेत होता आणि वारंवार पैसे मागत होता. यापूर्वीदेखील दोन वेळा तो तुरुंगात गेला होता. आता करणार नाही असं सांगून तो सतत दारू पित होता. त्याची मारहाण दिवसेंदिवस वाढत होती. शेवटी आईने पोलिसांकडे त्याची तक्रार केली. आणि पोलिसांनी कारवाई करीत त्याला तुरुंगात टाकलं.
जेलमध्ये जाताच मुलाने दिली जीवे मारण्याची धमकी
तिसऱ्यांदा मुलाला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. त्याची दारू सोडवण्यासाठी त्याच्यावर खूप ठिकाणी जाऊन उपचार केले. पण तो काही सुधारला नाही. यामुळे वडिलांची मानसिक अवस्था देखील बिघडली. मुलाच्या अत्याचाराला कंटाळूनच टोकाचा निर्णय घेतल्याचं आईने म्हटलं आहे. पण आईच्या या निर्णयाने मुलगा चांगलाच संतापला असून त्याने आईला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर तुला मारेन असं म्हटलं आहे. कोर्टात त्याने ही धमकी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.