ओडिशातील नीलगिरी एनएसी अंतर्गत बाणपूर गावात एका मद्यधुंद तरुणाने आपल्या आई आणि भावाशी भजीमुळे झालेल्या वादातून घर पेटवून दिलं. त्यामुळे त्यांचं तीन खोल्यांचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. गुरुवारी सायंकाळी वार्ड क्रमांक ११ मधील रहिवासी माधव बिस्वाल आणि गणेशवर बिस्वाल हे दारुच्या नशेत घरी परतल्यावर ही घटना घडली.
दोघांमध्ये भांडण झालं, भांडण सुरू असताना माधवने त्याच्या वृद्ध आईवर हल्ला केला. लहान मुलगा गणेशवरसह आई घरातून निघून गेली. त्यानंतर ती परत आली असता माधवने घर पेटवून दिल्याचं तिने पाहिलं. आग वेगाने पसरल्याने शेजाऱ्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. निलगिरी अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आग विझवली आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली.
निलगिरी पोलिसांनी माधव आणि गणेशवर या दोघांना ताब्यात घेतलं असून आगीचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. तरुणांच्या आईने सांगितलं, "माझा मोठा मुलगा माधव याने काल रात्री मला भजी बनवायला सांगितली, मी भजी बनवायला तयार असताना चुकून त्यात जास्त पाणी टाकलं आणि भजी बनवायला उशीर झाला. मग तो मला आणि त्याच्या भावाला शिवीगाळ करू लागला."
"जेव्हा त्याने आमच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली तेव्हा मी माझ्या लहान मुलाला घेऊन तेथून पळ काढला. काही वेळाने आम्ही आलो आणि त्याने आमच्या घराला आग लावल्याचं दिसलं." पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला अग्निशमन विभागाकडून माहिती मिळाली की, दोन भावांमध्ये झालेल्या भांडणामुळे एकाने आपल्या घराला आग लावली आहे. त्यानंतर आमची टीम घटनास्थळी पोहोचली. दोन्ही भाऊ मद्यधुंद अवस्थेत आढळले. आता ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत.