संजय दुनबळ
नाशिक : बुवाबाजी करणारी शिंदे गावातील जनाबाई बर्डे, या खून झालेल्या महिलेने बुवाबाजीच्या माध्यमातून अनेक लोकांची अंधश्रद्धेतून फसवणूक केली असण्याची शक्यता आहे म्हणून या महिलेच्याविरोधात देखील जादूटोणाविरोधी कायदाअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या महिलेकडे जाणाऱ्या ज्या लोकांचे अंधश्रद्धेपोटी शोषण आणि फसवणूक झाली असेल अशा लोकांनी नाशिकरोडपोलिसांकडे किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा आणि पोलिस यंत्रणेने योग्य तो तपास या अनुषंगाने करावा, ही महिला देवाची गादी चालवण्याचे भासवून अनेक लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन बुवाबाजी करत होती. निकेश पवार, जेल रोड, नाशिक रोड हा युवकदेखील त्याच्या समस्या घेऊन या महिलेकडे समस्या निराकरण करण्यासाठी दोन वर्षांपासून जात होता; परंतु त्याच्या समस्येचे निराकरण न झाल्याने व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने या महिलेचा खून केला.
एखाद्या व्यक्तीचा खून करणे गुन्हाच आहे आणि अशा गुन्ह्यासाठी गुन्हेगारांवर कायदेशीर करावी, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, राजेंद्र फेगडे आणि नाशिकरोड शाखेचे पदाधिकारी विजय खंडेराव यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.