- मनीषा म्हात्रे
मुंबई : नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस गस्ती नौका असे तिहेरी सुरक्षा यंत्रणांचे कवच भेदून ३ दिवसांचा धोका पत्करत त्या दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई गाठली आणि २६/११ ची ती काळरात्र सर्वांच्याच काळजात धडकी भरवून गेली. ९ अतिरेक्यांचा खात्मा करून अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडताना १८ पोलीस हुतात्मा झाले. तब्बल १६६ निष्पापांना प्राणाला मुकावे लागले, तर ३०४ जण जखमी झाले. या घटनेला १० वर्षे उलटली तरी जखमा आजही ताज्या आहेत. याच गुन्ह्याचा तपास आणि अतिरेक्यांपैकी एकमेव जिवंत हाती लागलेल्या कसाबला फासावर चढविण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तपास अधिकारी रमेश महाले यांच्याशी केलेली ही खास बातचीत.हल्ल्याचा कॉल येताच वरिष्ठांच्या सूचनेनुसार पथकासह नरिमन पॉइंट येथे तैनात होतो. हातात असलेल्या वॉकीटॉकीवरून मिनिटामिनिटाला अतिरेक्यांच्या हालचालीचे अलर्ट येत होते. मारियासाहेब नियंत्रण कक्षात बसले होते. त्यांनी दोन्ही अतिरेक्यांना डोळ्याला बांधून नायर रुग्णालयात नेण्यास सांगितले.तेथे गेल्यानंतर इस्माईलला मृत घोषित करण्यात आले. तर कसाब जिवंत असल्याचे समजले.त्या दिवशी कसाबसोबत पहिली भेट झाली आणि कसाबचा तपास हाती आला. यामध्ये १२ गुन्हे दाखल झाले. त्यात ११ गुन्ह्यांचा तपास आम्ही केला. सीएसएमटीवर झालेल्या हल्ल्याचा तपास २ महिने एटीएसकडे होता. त्यानंतर तोही आमच्याकडे देण्यात आला.१० वर्षांनंतरही मुंबई सुरक्षित आहे का?मुंबईवरचा धोका जरी कायम असला तरी त्यासाठी तपास यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे भविष्यात अशी घटना होणार नाही यासाठी ते ठोस पावले उचलत आहेत.२६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जाहीर झाला. विधान भवनाकडून रायफलच्या धाकावर चोरलेली स्कोडा कार घेऊन अतिरेकी मलबार हिलच्या दिशेने निघाल्याचा पहिला कॉल रात्री १२ वाजून ११ मिनिटांनी खणाणला. आम्ही वॉकीटॉकीवर सज्ज होतो. साडेबाराच्या ठोक्याला ही कार गिरगाव चौपाटीकडे अडवण्यात आली. बाहेरील लाइट बंद करून आतील लाइट सुरू करण्याच्या आम्ही सूचना दिल्या. मात्र इस्माईलने अप्पर लाइट मारली. तो प्रकाश डोळ्यावर आल्याने पोलिसांना नंबर दिसत नव्हता. पोलीस गाडीभोवती येत असल्याचे पाहून इस्माईलने ती वळविण्याचा प्रयत्न केला. गाडी दुभाजकाला धडकून कारचे चाक जाम झाले. रागाच्या भरात इस्माईलने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इस्माईलचा मृत्यू झाला. ही बाब बाहेरच्या पोलिसांना माहिती नव्हती.माझा पार्टनर मारला गेला या रागात त्या गाडीत बसलेला कसाब बाहेर आला आणि पायात पाय अडकून पडला.त्याचवेळी तुकाराम ओंबळेसाहेबांनी कसाबला एके-४७ सह पाहिले आणि पकडण्यासाठी मिठी मारली. कसाब त्यांना ढकलत होता, परंतु त्यांची मगरमिठी सुटायला तयार नव्हती. म्हणून त्याने ५ राउंड फायर केले. पाचही राउंड ओंबळे यांच्या पोटाच्या आरपार गेले. ४ राउंड मानेच्या बाजूने बाहेर आणि एक राउंड हाडाला लागून खिशात असलेल्या २ रुपयांच्या नाण्याला जाऊन भिडला. त्या नाण्याचा आकार सी राउंडसारखा झाला होता. ते नाणेही न्यायालयात सादर केले. आमचा संजय गोविंदकर पुढे सरसावताच कसाबने आणखी एक राउंड फायर केला.तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती. अवघ्या ७ मिनिटांच्या या थरारानंतर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले, असे महाले यांनी सांगितले.तपासातील आव्हानांना कसे तोंड दिले?पाकिस्तानमध्ये रचलेला कट आहे, हे कसाबच्या प्राथमिक चौकशीत समोर आले. पाकिस्तान अशा गुन्ह्यांची कधीच कबुली देत नाही, त्यामुळे हा हल्ला त्यांनीच केला, हे ज्याला मृत्यूची भीती नाही अशा कसाबकडून वदवणे आव्हानात्मक होते. ८१ दिवस त्याच्याकडे तपास केला. यादरम्यान विविध अफवांनी डोके वर काढले होते.तपासादरम्यान आठवणीतले शब्द कोणते?कसाबचा तपास हाती येताच सुरुवातीला तो दिशाभूल करत होता. जेव्हा बोलू लागला तेव्हा ‘साहब ८ बरस हो गये.. अफजल गुरू को फांसी नही दे सके. अभीसे गिनती शुरू करो. हिंदुस्तान मे फांसी नही दे सकते,’ असे तो म्हणाला. मात्र, त्याचे शब्द खोडून काढत चार वर्षाला ७ दिवस असताना त्याला फासावर लटकविले. त्या वेळी ‘साहब, तुम जिते मैं हारा...’ असे तो म्हणाला. ते शब्द कायम स्मरणात राहतील.अमेरिकेतून घेतला ५० ठिकाणांचा आढावाडेव्हिड हेडलीने लोकेशनसाठी कराची ते बधवार पार्क जीपीएसद्वारे प्रवास केला. यात ५० ठिकाणांचा समावेश होता. हेडलीने सर्व रेकी केली. त्यासाठी ताज, ओबेरॉयमध्ये राहिला. नरिमन हाउसमध्ये गेला. लोकल बोट करून तो ३ दिवस समुद्रात फिरला. याच जीपीएसद्वारे कसाबने मुंबई गाठली. अमेरिकेतून या ५० ठिकाणांचा आढावाही घेण्यात आला आहे.‘२६/११ मी आणि कसाब’ पुस्तकात काय दडलंय?या पुस्तकातून घटनेचा थरार, सामान्य नागरिक ते दहशतवादी कसाब कसा घडला? अफवा, साक्षीदारांचे किस्से? तपासातल्या आठवणी, आव्हाने तसेच पोलिसांचे काम काय आहे आणि काय होते, यासह अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.