अमरावती - केम प्रकल्पाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेपुढे बयाण नोंदविण्याकरिता गुरुवारी हजर झाला. सकाळी १० वाजता सुरू झालेली कार्यवाही सायंकाळी साडेसहा वाजता आटोपली. आणखी पुढील दोन दिवस त्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून बयाण नोंदविले जाणार आहे. केम प्रकल्पाच्या निधीत ६ कोटी १२ लाख ३९ हजार ९३५ रुपयांनी शासनाची आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी असलेले तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरींनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर गणेश चौधरींनी ८ ते १० ऑगस्टपर्यंत पोलिसांना तपासात सहकार्य करावे, असे आदेश झाले. त्यानुसार आरोपी गणेश चौधरी ८ ऑगस्ट रोजी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्यापुढे दाखल झाला. गैरव्यवहाराशी संबंधित १३ प्रकारच्या मुद्द्यांवर त्याच्याकडून बयाण नोंदविण्यात आले. शुक्रवार व शनिवारीदेखील त्याला हजेरी द्यावी लागणार आहे. दरम्यान, बयाणासाठी पोलीस आयुक्तालयात हजर झालेल्या गणेश चौधरीची आर्थिक गुन्हे शाखेपूर्वी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या कक्षात पेशी झाली. यावेळी त्यांनीही चौकशी केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत केम प्रकल्पातील विविध आर्थिक व्यवहाराचे रहस्य कितपत उलगडले, फसवणूक प्रकरणातील अन्य आरोपींची नावे पुढे आली काय, हे पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.
गणेश चौधरीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 9:22 PM
केममधील गैरव्यवहार : १३ मुद्द्यांवर प्रश्न, पुढील दोन दिवसही नोंदविणार बयाण
ठळक मुद्देगैरव्यवहाराशी संबंधित १३ प्रकारच्या मुद्द्यांवर त्याच्याकडून बयाण नोंदविण्यात आले. आणखी पुढील दोन दिवस त्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून बयाण नोंदविले जाणार आहे. शुक्रवार व शनिवारीदेखील त्याला हजेरी द्यावी लागणार आहे.