नवी दिल्ली - यंदाच्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सला अपेक्षेनुरूप सुरुवात करता आलेली नाही. मुंबईविरुद्धच्या पहिल्या लढतीत बाजी मारल्यानंतर चेन्नईली पुढच्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. कचखाऊ फलंदाजी हा चेन्नईसाठी चिंतेचा मुद्दा बनला आहे. दुखापतग्रस्त अंबाती रायडू आणि वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेणारा सुरेश रैना यांची अनुपस्थिती चेन्नईला प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्सच्या समर्थकांकडून रैनाला संघात परत बोलावण्याची मागणी करत आहेत. मात्र चेन्नई सुपरकिंग्स आणि सुरेश रैना यांच्यातीत संबंध आता जवळपास संपुष्टात आले असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.आयपीएलमध्ये खेळण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ससोबत यूएईमध्ये जाऊन नंतर वैयक्तिक कारण देत माघारी परतलेल्या सुरेश रैनाने आता ट्विटरवर चेन्नई सुपरकिंग्सला फॉलो करणे बंद केले आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्स आणि रैना यांच्यातील संबंध कधीही न सुधरण्याइतपत बिघडल्याचे संकेत मिळत आहेत. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी अगदी काही दिवस आधी सुरेश रैना मायदेशी परतला होता. त्याच्या या निर्णयामुळे चेन्नई सुपरकिंग्सचे मालक एन. श्रीनिवासन कमालीचे नाराज झाले होते.शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या लढतीत चेन्नईला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर सोशल मीडियावर चेन्नई सुपरकिंग्सच्या चाहत्यांनी रैनाला संघात परत बोलावण्याची मागणी सुरू केली होती. संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीसुद्धा रैना आणि रायडू संघात नसल्याने संघ विस्कळीत झाल्याचे म्हटले होते. मात्र नंतर सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथ यांनी सांगितले की, रैनाचे चेन्नई सुपरकिंग्समधील पुनरागमन कठीण दिसत आहे. सध्या आम्ही रैनाला परत बोलावण्याचा विचार करू शकत नाही. तो स्वत:च माघारी गेला होता. क्रिकेटमध्ये जीत हार होतच असते. पुढच्या सामन्यांमधून आम्ही नक्कीच पुनरागमन करू. सीएसकेच्या सीईओंचे हे विधान ऐकल्यानंतरच रैनाने सीएसकेला ट्विटरवर अनफॉलो केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
IPL 2020 : चाहत्यांकडून संघात परतण्याची होतेय मागणी; आता रैनाने CSKबाबत घेतला मोठा निर्णय
By बाळकृष्ण परब | Published: September 27, 2020 1:23 PM
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ससोबत यूएईमध्ये जाऊन नंतर वैयक्तिक कारण देत सुरेश रैना माघारी परतला होता.
ठळक मुद्दे चेन्नई सुपरकिंग्स आणि सुरेश रैना यांच्यातीत संबंध आता जवळपास संपुष्टात आले असल्याची चिन्हे दिसू लागली आहेतसुरेश रैनाने ट्विटरवर चेन्नई सुपरकिंग्सला फॉलो करणे बंद केले आहेदुखापतग्रस्त अंबाती रायडू आणि वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेणारा सुरेश रैना यांची अनुपस्थिती चेन्नईला प्रकर्षाने जाणवत आहे