कळंगुट : कांदोळी येथे एका रिसॉर्ट्सच्या फ्लॅटमध्ये आयपीएल बेटिंग प्रकरणी कळंगुट पोलिसांनी आणखी तिघांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम, ३ मोबाईल संच, १ लॅपटॉप असा ऐवज जप्त केला. तीन दिवसांत कांदोळीमध्ये आयपीएल बेटिंग प्रकरणी ही दुसरी कारवाई आहे.
अटकेतील तिघेही हैदराबाद येथील असून भानु पी (२१), राजू राव (३४), शाही किरण (३३) अशी संशयितांची नावे आहेत. ‘मॅग्नम रिसॉर्ट्स’ येथे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई दि. ३ रोजी, रात्री राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलोर यांच्यातील क्रिकेट सामान्यावेळी बेटिंग करताना करण्यात आली. यावेळी संशयितांकडून ८४०० रुपये रोख, तीन मोबाईल संच व एक लॅपटॉप जप्त केला.
कळंगुट पोलिसांनी गोवा सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम ३ आणि ४ चे उल्लंघन केल्याबद्दल संशयितांवर गुन्हा नोंद केला. त्यानंतर संशयितांना जामिनावर सोडण्यात आले. याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक जतिन पोतदार हे करीत आहेत. हा छापा पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विकास देयकर, हेड कॉन्स्टेबल विनोद नाईक, कॉन्स्टेबल सुरेश नाईक यांनी टाकला.
दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी कांदोळी येथे एका व्हिलावर छापा टाकून ‘आयपीएल’मधील कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट सामान्यावर बेटिंग घेणा-या एका रॅकेटचा कळंगुट पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी राजस्थान तसेच नेपालमधील मिळून पाच जणांना अटक केली होती. त्यावेळी संशयितांकडून ९५ हजार रोख, २ लॅपटॉप, ९ मोबाईल संच असा ऐवज जप्त केलेला.