औरैया - हॅलो, मी सरिता चौहान बोलतेय...दिबियापूर रोडवर प्लॅस्टिक सिटीजवळ रस्त्यावर बाईकस्वार २ लुटारुंनी बंदूक दाखवून आम्हाला लुटलं आहे. लवकर पोहचा, ते औरैयाच्या दिशेने पळालेत. उत्तर प्रदेश पोलिसांची तत्परता पाहण्यासाठी एका महिलेने फिल्मी स्टाईल ड्रामा केला. तक्रार केल्यानंतर पोलीस किती गंभीरपणे एखाद्या गुन्ह्याची चौकशी करतात यासाठी महिलेने हा सगळा प्लॅन आखला होता.
ही महिला इतर कुणी नसून खुद्द आयपीएस अधिकारी चारू निगम होती. गुरुवारी तिच्या सहकारी पोलिसांची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी वेष बदलून ककोर मुख्यालयाजवळील प्लॅस्टिक सिटी येथील रोडवर बाईकनं पोहचल्या. तिथून ११२ नंबरवर कॉल करत त्यांनी पोलिसांना तक्रार दिली. आयपीएस चारू निगम यांनी ११२ नंबरवर कॉल करत पल्सरवरून आलेल्या २ जणांनी आम्हाला रस्त्यात धमकावत लुटल्याचं सांगितले. त्यानंतर काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तपासाला सुरुवात केली.
चारू यांनी सांगितलेल्या चेहरेपट्टीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. घटनास्थळी पोहचलेले पोलीस घडलेला प्रकार योग्य मानून तपासाला लागले. चारू निगम या अभिनय करत राहिल्या. पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम आणि सतर्कता पाहण्यासाठी औरैयाचे पोलीस अधिक्षक यांनी स्वत:ची ओळख लपवून निर्जन रोडवर बंदुकीच्या धाकावर अज्ञात व्यक्तींना लुटण्याची खोटी तक्रार ११२ क्रमांकावर दिली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या समाधानी झाल्या.
आयपीएस अधिकारी चारू निगम यांनी गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता. त्याचसोबत चेहरा रुमालाने झाकला होता. स्थानिक भाषेत त्या पोलिसांशी संवाद साधत होत्या. जवळच्या गावात नातेवाईक असल्याची बतावणी केली. रस्त्यात दुचाकीस्वारांनी माझ्या बाईकचा पाठलाग करून लूट केली. त्यानंतर पोलिसांना फोन करून माहिती दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांच्या तत्परतेनं चारू निगम खुश झाल्या. घटनास्थळी पोहचलेले पोलीस आयपीएस चारू निगमला ओळखू शकले नाहीत. खूप वेळ पोलीस आरोपीच्या शोधात भटकत राहिले अखेर चारू निगम यांनी सत्य समोर आणले तेव्हा पोलिसांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"