भिवंडी - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकरला एनसीबी ने ठाणे कारागृहातून ताब्यात घेत भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीत अटक केलेल्या दोन आरोपींशी त्याचे संबंध असल्याचे उघड झाल्याने या प्रकरणी इकबाल कासकर यास अटक करीत शुक्रवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता कासकर यास एक दिवसाची एनसीबी कोठडी ठोठावण्यात आली आहे .
मिळालेल्या माहिती नुसार मुंबई एनसीबी विभागाने १७ जून रोजी भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावर शब्बीर उस्मान शेख व निजामुद्दीन अहमद ताजा यांना अटक करून त्यांच्या जवळून १२ किलो चरस हस्तगत केला होता. या प्रकरणी चौकशी दरम्यान अटक आरोपींचे इकबाल कासकर बरोबरचे कनेक्शन समोर आल्याने एनसीबी ने खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या इकबाल कासकर याचा ताबा ठाणे कारागृहातून घेत त्यांना भिवंडी येथील न्यायालयात हजर केले असता एनसीबीच्या वकिलांनी इकबाल कासकर यास २७ जून पर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु न्यायालयाने फक्त एक दिवसाची पोलीस कोठडी दिली असून उद्या इकबाल कासकर यास ठाणे विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे .
शुक्रवारी भिवंडी न्यायालयात इकबाल कासकर यास आणणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर भिवंडी न्यायालयास पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आला होता .