मुंबई - राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी कसून चौकशी केली. मृत गँगस्टर इकबाल मिर्ची उर्फ इकबाल मेमन याच्याशी मालमत्ता खरेदी प्रकरणी असलेल्या कथित संबंध असल्याच्या कारणावरुन त्यांच्याकडे जवळपास 11 तास चौकशी सुरु होती. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर परिसरात असलेल्या ईडीच्या कार्यालयात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांच्याकडे वरळीतील सीजे हाऊसच्या अनुषंगाने विचारणा केली.
पटेल यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे सीजे हाऊसच्याबाबत सुरु केलेली चौकशी रात्री आठनंतरही सुरु होती. या दिर्घकाळ चौकशीमध्ये अधिकाऱ्यांनी पटेल यांना मिलेनियम डेव्हलपर्सच्या माध्यमातून मिर्ची ,त्याची पत्नी मेहरा हिच्याशी व्यवहार केला आहे का, त्याच्याशी भेट घेतली होती का, पुर्नविकासामध्ये कोणकोण भागीदार होते, आदी प्रश्नाबाबत सविस्तर माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार पटेल यांनी बहुतांश प्रश्नाची उत्तरे ही नकारार्थी दिली असून मिर्चीशी कसलाही संबंध नसल्याचे सांगितले आहे. महाष्ट्रात विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरु असल्याने पटेल यांच्या चौकशीमुळे त्यांचे राजकीय पडसाद उमटू नये, त्याबाबत पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, पटेल हे एकटेच आले होते. त्यांच्यासमवेत एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता नव्हता, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
ईडीने याप्रकरणी आठवड्यापूर्वी अटक केलेल्या रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालाच्या चौकशीतून पटेल यांचे नाव पुढे आले आहे. २००७ मध्ये त्याच्या विकास करार होवून हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरारी असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने १९८६मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती.अधिकाऱ्यांनी पटेल यांची विनंती नाकारलीप्रफुल्ल पटेल यांनी ईडीचे अधिकारी कार्यालयात पोहचण्यापूर्वीच त्याठिकाणी हजेरी लावली होती. अकराच्या सुमारास अधिकारी आल्यानंतर त्यांनी आपल्याला निवडणूक प्रचारासाठी जावयाचे आहे. त्यामुळे निवडणूका झाल्यानंतर चौकशीसाठी वेळ देण्यात यावी, अशी विनंती केली. मात्र अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावत आज चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.