लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई, ठाण्यासह नाशिक, पुणे आणि नवी मुंबई परिसरातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच मंगळसूत्र जबरीने खेचून पळणाऱ्या इराणी टोळीतील सराईत चोरटा मेहंदी हसन मुस्लीम जाफरी (२८, रा. रशिद कम्पाउंड, मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री अटक केली. ठाणे पोलिसांच्या टॉप २० यादीतील वॉन्टेड सोनसाखळी चोरट्यांमध्येही त्याचा समावेश होता.
मुंब्रा येथील रशीद कम्पाऊंड भागात टॉप २० यादीतील इराणी टोळीमधील मोस्ट वॉन्टेड सोनसाखळी चोरटा जाफरी येणार असल्याची टीप अमली पदार्थविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय मोरे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय मोरे, जमादार मोहन परब, हवालदार राजकुमार तरडे, अभिजीत मोरे, पोलीस नाईक प्रशांत निकुंभ आणि अनुप राक्षे आदींच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास मुंब्रा परिसरात गस्त घालीत असताना जाफरी याला रशीद कम्पाउंड भागात सापळा रचून ताब्यात घेतले.याआधीही इराणी टोळीतील चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.
मेहंदी जामिनावर होता सुटलेला यापूर्वी ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी सोनसाखळी जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये तो जामिनावर सुटला आहे. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली.
ताब्यात घेताना इराणींचा कांगावा...मेहंदी जाफरी याच्याविरुद्ध मुंबई ठाण्यासह डायघर पोलीस ठाण्यातही जबरीने सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी २०२१ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याला पकडण्यासाठी ठाणे पोलिसांचे पथक गेले, त्यावेळी त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी या पथकातील कर्मचाऱ्यांशी काही इराणी महिला, पुरुषांनी झटापटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही या इराणींशी सामना करून या पथकाने जाफरीला त्यांच्या तावडीतून ताब्यात घेत आधी मुंब्रा नंतर डायघर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने डायघर चोरीची कबुली दिली.