नवी दिल्ली : दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्या वस्तूवर कमाल किरकोळ किंमत (Maximum Retail Price-MRP) दिली असते. त्यानुसार, आपण संबंधित वस्तूंचे पैसे दुकानदाराला देतो. तसेच, लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून 'जागो ग्राहक जागो'… या जाहिरात मोहिमेद्वारे सरकार लोकांना वारंवार जागरूक करत आहे की, त्यांनी कोणत्याही वस्तूवर चिन्हांकित कमाल किरकोळ किंमत (MRP) पेक्षा जास्त किंमत देऊ नये.
यासोबतच दुकानदार आणि विक्रेत्यांना एमआरपीपेक्षा जास्त दराने कोणत्याही वस्तूची विक्री करू नये, असा इशाराही सरकारकडून दिला आहे. पण, काही लोकांना कदाचित ही गोष्ट समजत नाही. अशीच एक घटना आयआरसीटीसीच्या (IRCTC) कंत्राटदारसोबत घडली, त्याने ट्रेनमध्ये पाण्याच्या बाटलीसाठी एआरपीपेक्षा 5 रुपये जास्त आकारले, यासाठी त्याला 1 लाख दंड भरावा लागला. हे प्रकरण भारतीय रेल्वेच्या अंबाला विभागाशी संबंधित आहे.
एचटीच्या रिपोर्टनुसार, आयआरसीटीसीचे परवानाधारक कंत्राटदार मे. चंद्र माऊली मिश्रा यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एका प्रवाशाने पाण्याच्या बाटलीसाठी एमआरपीपेक्षा 5 रुपये जास्त घेतल्याची तक्रार दाखल केली होती. लखनौ-चंदीगढ-लखनौसाठी धावणाऱ्या ट्रेन 12231/32 मध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू पुरवण्याचे कंत्राट मे. चंद्र माऊली मिश्रा यांच्याकडे आहे. या ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार नसल्याने त्यांना हा माल स्वत:च पुरवावा लागतो.
गुरुवारी शिवम भट्ट नावाच्या प्रवाशाने ट्विटरवर 5 रुपये अधिक आकारण्याचा व्हिडिओ शेअर केला होता, त्यानंतर कंत्राटदारावर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवम चंदीगडहून शाहजहानपूरला जात होते. त्यावेळी विक्रेत्याकडून शिवम यांनी 15 रुपये एमआरपी असलेली पाण्याची बाटली विकत घेतली. परंतु त्यांच्याकडून विक्रेत्याने 20 रुपये घेतले. याबाबत शिवम यांनी तक्रार दाखल केली. यानंतर माल विकणारा दिनेश या विक्रेत्याचा व्यवस्थापक रवी कुमार याला अटक करण्यात आली आहे.
एक लाख रुपयांचा दंड या तक्रारीवर कारवाई करत लखनौचे डीआरएम मनदीप सिंग भाटिया यांनी दंड आकारण्याची शिफारस केली. यासोबतच कंत्राटदाराची कागदपत्रे तपासून अखेर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.