नीमच : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नीमचमध्ये एका वृद्धाला एका व्यक्तीकडून जबर मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, मारहाण करण्यात आलेल्या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. आता व्हिडिओ पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये असे ऐकू येते की, वृद्धाला मारहाण करणारा व्यक्ती विचारात आहे की, तुझे नाव मोहम्मद काय आहे? जावराहून आला आहे का? चल मला तुझे आधार कार्ड दाखल. यावर वृद्ध 200 रुपये घ्या, असे म्हणताना दिसत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील मनसा येथील आहे. भंवरलाल जैन (वय 65) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मृतदेह मनसा येथे आढळून आला आहे. भंवरलाल जैन हे रतलामच्या सरसी गावातील रहिवासी होते.
धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या एक दिवस आधी भंवरलाल जैन यांचा फोटो मनसा पोलिसांनी प्रसिद्ध केला होता. कारण, त्यांचा मृतदेह रामपुरा रोड मारुती शोरूमजवळ आढळला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भंवरलाल जैन यांचा भाऊ आणि गावातील लोकांनी मोठ्या संख्येने मनसा पोलीस ठाणे गाठून आरोपीला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मनसा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीची ओळख पटवली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव दिनेश कुशवाह असे आहे. तो मनसा येथील रहिवासी आहे. तसेच, दिनेश कुशवाह हा भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी कलम 302 अंतर्गत एफआयआर नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, मनसा पोलीस स्टेशनचे प्रभारी केएल डांगी यांनी सांगितले की, यातही अधिक तपास केला जात आहे, तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत, त्यानंतर आणखी लोकांवर कारवाई केली जाईल.
घटनेनंतर काँग्रेसचा हल्लाबोलया घटनेनंतर काँग्रेस नेत्यांनी मध्य प्रदेशातील भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मध्यप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नसून आधार कार्ड न दाखवल्यामुळे एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. मुस्लिम, दलित, आदिवासींनंतर आता जैनांवर हल्ले होत आहे. यामुळे मध्य प्रदेशात कोणीही सुरक्षित नसल्याचे काँग्रेसचे आमदार जितू पटवारी म्हणाले.