- शशिकांत ठाकूर
कासा: गावात कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा, अशी पालघर पोलिसांनी ‘विश्वास जनजागृती मोहीम’ सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी डहाणू तालुक्यातील निंबापूर येथे एका वेडसर इसमाला स्थानिकांनी सुखरूप पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर, पोलिसांनी मूळच्या जालना येथील इसमाला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्या या यशस्वी शोधमोहिमेमुळे एका पाच वर्षे बेपत्ता इसमाला आपले घर मिळाले आहे.
मूळचे जालना येथील असलेले राणोजी जाधव हे मागील साडेचार ते पाच वर्षांपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून त्यांची शोधाशोध सुरू होती, मात्र शोध लागत नसल्याने राणोजी यांचे कुटुंबीय हतबल झाले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाच्या ९-१० किमी अंतरावर निंबापूर या गावात एक इसम फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी या इसमाला कासा पोलिसांच्या स्वाधीन केले.
यानंतर कासा पोलिसांनी विचारपूस करून तो मूळचा जालना जिल्ह्यातील कोटी या गावातील असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली. कासा पोलिसांनी गुगलमार्फत त्याच्या गावातील एका रजिस्टर दुकानदाराचा मोबाइल नंबर मिळवून त्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर दुकानदारामार्फत त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क केला. राणोजी यांना गुरुवारी कासा येथे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यामुळे कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे राणोजी त्यांच्या कुटुंबीयांकडून विशेष आभार मानण्यात आले. दरम्यान, वर्षभरापूर्वी कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडचिंचले येथे चोर समजून रात्रीच्या वेळी जमावाने दोन साधू आणि त्यांचा चालक यांची हत्या केली होती. मात्र, सदर मोहिमेमुळे आता लोकांना जाणीव झाली आहे.