बारामती : बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना मुलींना दारु पाजत पुण्यातील हडपसर परिसरातील त्यांच्या मित्राच्या खोलीत चौघांनी लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार १४ सप्टेंबर रोजी उघड झाला होता. या प्रकरणी बारामती पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत चैघांना अटक केली होती. आता या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.या दोन अल्पवयीन या मुलींवर यापूर्वी आणखी सात जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता अकरा झाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात ज्ञानेश्वर भारत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) व यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) व जय उर्फ जयेश अशोक मोरे (रा. तांदूळवाडी, बारामती) या चौघांना अटक केली होती. त्यात आता ओंकार भारती, ओम कांबळे, आप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे व श्रेणीक भंडारी (पूर्ण नाव,पत्ते नाहीत) यांची भर पडली आहे.
दि. १४ सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या दि. १४ रोजी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या.पुण्यात एसटि बस ने जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील खोलीवर त्या दोघींना बोलावले. त्यानंतर दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले.
मुलींपाठोपाठ तो आणि अन्य एकजण बारामतीतून हडपसरला पोहचले. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारु पाजून चौघांनी आरोपीने आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. दरम्यान यातील एका मुलीने हडपसरहून तेथील एका प्रवाशाच्या मोबाईल वरून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधत मुलींना ताब्यात घेतले.त्यानंतर बारामतीतून महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले. दि. १६ रोजी या मुलींना पोलिसांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना या दोघींनी दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली.
त्यानुसार सुरुवातीला ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अन्य ३ आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार त्यावेळी चौघाजणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरुच ठेवत मुलींना विश्वासात घेतले.तसेच यापूर्वी त्यांच्याबाबत असे काही प्रकार घडले आहेत का,याबाबत माहिती घेत सखोल तपास केला.यामध्ये त्यावेळी यापूर्वी आणखी सातजणांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ११ वर जावून पोहोचली आहे. या घटनेत दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एका घटनेत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह अॅट्राॅसिटी, लैंगिक शोषण तर दुसर्या घटनेत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.