नवी मुंबई : तुर्भे स्टोअर परिसरात कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. अधिक चौकशीत तिने विवाहबाह्य संबंधातून हे मूल जन्मल्याचे सांगितले. माहेरी येऊन मुलाला जन्म दिल्यानंतर त्याची हत्या केल्याची कबुली तिने दिली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून या गुन्ह्याचा उलगडा केला. सदर महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
तुर्भे स्टोअर येथील कचराकुंडीत १८ जुलैला पुरुष जातीचे मृत अर्भक आढळले होते. या नवजात बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळण्यात आली होती. त्यावरून अर्भकाची हत्या करण्यात आल्याचा संशय बळावला होता. मात्र, परिसरात कुठेही सीसीटीव्ही नसल्याने या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान तुर्भे एमआयडीसी पोलिसांपुढे निर्माण झाले होते. गुन्ह्याची उकल करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सहायक निरीक्षक प्रज्ञा मुंडे, नीलेश येवले, उपनिरीक्षक रवींद्र जाधव आदींचे पथक केले होते. त्यांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी महापालिकेच्या आशा वर्कर्स यांची मदत घेतली.
परिसरातील गरोदर होत्या अशा महिलांची माहिती मिळवून अधिक चौकशी केली. त्यामध्ये माहेरी आलेल्या एका गरोदर महिलेची माहिती उघड झाली. त्याद्वारे पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिने मुलाला जन्म देताच नाळेने त्याचा गळा आवळून हत्या करून ते मृत अर्भक कचराकुंडीत टाकल्याची माहिती दिली. कोपरखैरणे येथे सासर व तुर्भे स्टोअर परिसरात माहेर असलेल्या या महिलेचे कोपरखैरणे परिसरातील एका रिक्षाचालकासोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यातून ती गरोदर राहिली होती.
घरातच दिला जन्मगेल्या काही महिन्यांपासून तिचे प्रियकरासोबत देखील वाद सुरू होते. यामुळे तिने माहेरी येऊन मुलाला घरातच जन्म दिला. ते ओरडू नये म्हणून नाळेने त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर रात्रीच्या वेळी मृतदेह परिसरातील कचराकुंडीत टाकला.