मुंबईतील राजकारण्यांशी संबंधीत लोकांवर छापे टाकल्यानंतर आयकर विभागाने आता राज्यातील बड्या रिअल इस्टेट कंपनीवर छापे टाकले आहेत. यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने हिरानंदानी ग्रुपच्या विविध ठिकाणांवर आज छापेमारी केली आहे.
करचोरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमधील २४ ठिकाण्यांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. हिरानंदानी डेव्हलपर्सची स्थापना 1978 मध्ये दोन भावांनी - निरंजन हिरानंदानी आणि सुरेंद्र हिरानंदानी यांनी केली. गेल्या चार दशकांमध्ये या ग्रुपने प्रामुख्याने महाराष्ट्रात अनेक प्रकल्प उभारले आहेत.
आता निरंजन आणि सुरेंद्र हिरानंदानी हे स्वतंत्र रिअल इस्टेट कंपन्या चालवत आहेत. निरंजन हिरानंदानी हे हिरानंदानी कम्युनिटीजचे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, तर सुरेंद्र हिरानंदानी हाऊस ऑफ हिरानंदानीचे अध्यक्ष आणि संचालक आहेत.