भुवनेश्वर : आयकर विभागाने कथित करचुकवेगिरीच्या आरोपांवरून ओडिशास्थित मद्य उत्पादक कंपनी आणि काही संबंधित युनिटवर टाकलेल्या छाप्यात बुधवारी ५० कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त केली. तसेच ती जप्तीचा आकडा १००० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही रक्कम मोजण्यासाठी आणण्यात आलेली मशीनही नोटा मोजताना बंद पडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने देशातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीपैकी एक असलेल्या या कंपनीच्या कार्यालय व संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. ही कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. या ठिकाणी कोट्यवधीची रोकड पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले. प्रामुख्याने करचोरीच्या आरोपात ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ही रोख एकाच ठिकाणाहून जप्त करण्यात आली की एकापेक्षा जास्त हे स्पष्ट झालेले नाही.
ट्रकमधून नेली जप्त रोकड बुधवारी रात्री आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर जप्त केलेली रोकड मोठमोठ्या पिशव्या आणि पोत्यांतून बँकेत नेण्यासाठी ट्रकही मागविण्यात आला होता.
पैसे मोजण्याचेही अधिकाऱ्यांपुढे आव्हानकारवाईत जप्त करण्यात येणारी रोकड १००० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ती मोजण्यासाठी आणलेली मशीनही बंद पडल्याने अधिकाऱ्यांना अडचण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोट्यवधीची करफसवेगिरीसंबंधित मद्य उत्पादक कंपनीने कोट्यवधी रुपयांच्या आयकरात फसवेगिरी केल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी ही कारवाई केल्यानंतर हे घबाड सापडल्याचे पुढे आले.